विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आगामी विधानसभा निवडणूक विलेपार्ले किंवा मुलुंडमधून लढविणार असल्याने ते विधानपरिषदेसाठी आता उभे राहणार नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची निवड भाजपला करावी लागणार असून पांडुरंग फुंडकर यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पुन्हा पडणार की नव्या नेत्याची निवड होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुका २० मार्चला होत असून भाजपचे तावडे, फुंडकर यांची मुदत संपत आहे. पण आपली लोकांमधून थेट निवडून येण्याची क्षमता सिद्ध करून दाखविण्यासाठी तावडे यांना आता विधानसभेच्या उमेदवारीत रस आहे. ते विलेपार्ले किंवा मुलुंड येथून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. मुलुंड येथील भाजप आमदार सरदार तारासिंह हे आपली जागा सोडण्यासाठी तयार नसून त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवायची आहे. आपला मतदारसंघ तावडे यांच्यासाठी हवा असल्यास विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची मागणी तारासिंह यांनी पक्षाकडे केली आहे. तारासिंह यांचे वय ७५ हून अधिक असल्याने त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलास शीव-माटुंगा परिसरातून उमेदवारी देण्याचा विचार पक्षात सुरू आहे. पण तारासिंह यांनी खूपच विरोध केला, तर तावडे विलेपार्ले किंवा डोंबिवलीतूनही लढतील. विधानसभेच्या तिकीटवाटपाच्या वेळी अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
फुंडकर हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांना दूर करून तावडे यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. आता तावडे विधानसभा लढविणार असले, तर त्यांच्याजागी पुन्हा फुंडकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. अन्य काही नेते या पदासाठी इच्छुक असून निवडणुकीसाठी उमेदवार ठरल्यानंतर पक्षनेतेपदाचा निर्णय होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा