‘मराठी साहित्यिकांनी फुकटेगिरी बंद करावी,’ असा सल्ला घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना देणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी २४ तास उलटायच्या आत नेमकी उलट भूमिका घेऊन ‘घुमानजाव’ केले आहे. घुमान साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून मोफत व्हावे, यासाठी तावडे यांनी दूरदर्शनच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सोमवारी याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.
घुमान येथील साहित्य संमेलनाच्या थेट प्रक्षेपणासाठी दूरदर्शनने कोणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी आयोजकांनी केली होती. मात्र त्यावर ‘साहित्यिकांनी फुकटेगिरी बंद करावी’ असे खडे बोल तावडे यांनी मोठय़ा आवेशात सुनावले होते. तसेच संमेलनाच्या प्रक्षेपणाचे हक्क स्वत:कडे ठेवून संमेलन आयोजकांनी ते विकायला हवेत, असेही मार्गदर्शनही त्यांनी केले होते. मात्र तावडे यांच्या या भूमिकेवर रविवारी विरोधी पक्षांसह विविध स्तरांमधून जोरदार टीका झाली.
त्यामुळे २४ तास उलटायच्या आता तावडे यांनी भूमिका बदलली. साहित्य संमेलनाचे मोफत प्रक्षेपण व्हावे यासाठी थेट दिल्लीतील दूरदर्शनच्या महासंचालकांशी आणि मुंबईतील संचालक मुकेश शर्मा यांच्याशी चर्चा केल्याचे तावडे यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केले. संमेलनाचे थेट प्रक्षेपण डीडी सह्य़ाद्री वाहिनीवर फुकटात दाखवावे, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. दूरदर्शनने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोमवारी याबाबत अंतिम निर्णय होईल, असे तावडे यांनी ट्विटरवरून जाहीर केले. थेट प्रक्षेपणासाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टींची चाचपणी दूरदर्शन करणार असून त्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader