तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक व अन्य पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांची दारे बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारने आता काही खास अधिकाऱ्यांच्या सेवा मंत्रालयात ‘उसनवारी’ने घेण्याचा नवा पायंडा पाडला आहे. उसनवारी तत्त्वावर एका अधिकाऱ्याची शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी गेली दहा वर्षे मंत्री आस्थापनेवर काम केले, त्यांना नव्या सरकारातील मंत्र्यांकडे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक, विशेष कार्य अधिकारी किंवा अन्य पदांवर नेमणूक द्यायची नाही, असा धोरणात्मक निर्णय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घेतला आहे. त्यानुसार मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या बऱ्याच अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागांत पाठविण्यात आले. मात्र, त्यातही काही अधिकाऱ्यांची खास जागांवर वर्णी लावण्यात आली. त्यामुळे एकूणच अधिकारी वर्गातून नाराजीचे सूर निघू लागले आहेत.
नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री व मंत्री आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात, त्यांचा कालावधी किती असावा, याबाबत मार्गदर्शक सूचना देणारा आदेश सामान्य प्रशासन विभागाने गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे. त्यात तात्पुरत्या नियुक्त्यांचा उल्लेख नाही. तरीही विनोद तावडे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांची उसनवारी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार सबनीस आठवडय़ातील तीन दिवस मंत्रालयात व उरलेले तीन दिवस नाशिक येथे क्रीडा अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा