मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांमध्ये सर्व स्तरातील लोकांनी सहभागी व्हावे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी एक लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले.
या लोकचळवळीत  लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विद्यापीठांचे कुलगुरु, महाविद्यालये, महानपगरपालिकेचे महपौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य, उच्च माध्यमिक व माध्यमिक या सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, मराठी भाषा क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, तसेच मराठी प्रेमी जनतेने सक्रियपणे सहभागी व्हावे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन तावडे यांनी केले.
मराठी भाषा दिवसापूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारीपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा, असे उद्दिष्ट मराठी भाषा विभागाने ठेवले आहे. यासाठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या नावे ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा’ अशी आग्रही विनंती करणारी विनंती पत्र लोकप्रतिनिधी, मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि संपादकांनी पाठवावे, अशी विनंती तावडे यांनी केली आहे. पत्र पाठविण्यासाठी साहित्य अकादमीचा पत्ता- डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी, अध्यक्ष, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, ३५, फिरोजशाह मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

Story img Loader