* दुर्मिळ मोटारी, मोटरसायकलची रविवारी रॅली
* देशभरातून १००हून अधिक गाडय़ांचा सहभाग
रस्त्यावरून एखादी जुनी गाडी जाताना दिसली की, मान आपोआप त्या गाडीच्या दिशेने वळते. खऱ्या ‘कार’प्रेमींचा जीव अशा ‘अँटिक’ गाडय़ांमध्ये अडकलेला असतो. ‘द व्हिण्टेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया’ (व्हिसीसीसीआय)ने या अस्सल गाडीवेडय़ांसाठी रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी अक्षरश: मेजवानी आयोजित केली आहे. निमित्त आहे, व्हिण्टेज कार रॅलीचे!
या रॅलीत देशभरातील १०० हून अधिक देखण्या, दुर्मिळ व्हिण्टेज कार आणि मोटरसायकल यांचा सहभाग असेल, अशी माहिती व्हिसीसीसीआयचे अध्यक्ष नितीन डोसा यांनी दिली. युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनीने हा अनोखा सोहळा प्रायोजित केला आहे.
यंदाच्या व्हिण्टेज कार रॅलीत १९४० ते १९८० या चार दशकांतील दुर्मिळ गाडय़ांचा सहभाग असणार आहे. तसेच अगदी २०१३ पर्यंत तयार झालेल्या पण त्या गाडीसारखी दुसरी कोणतीच गाडी जगात नसलेल्या गाडय़ांनाही या रॅलीत सहभागी होता येणार आहे. ही रॅली १९४० ते १९८० या कालावधीतील गाडय़ांसाठी असली, तरी १९००पासून तयार झालेल्या गाडय़ांची झलक रॅलीत पाहायला मिळेल. या कार रॅलीत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीकरिता १५ फेब्रुवारी ही तारीख असून आतापर्यंत भारतातील कोणत्याही व्हिण्टेज कार रॅलीमध्ये पाहायला न मिळालेल्या काही दुर्मिळ गाडय़ा यंदा सहभागी होतील, अशी आयोजकांची अपेक्षा आहे.

Story img Loader