मंगल हनवते
मुंबई : मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने वेगमर्यादेचे पालन होत नाही. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी रावेत, किवळी उड्डाणपूल ते खंडाळा, अमृतांजन पूल हद्दीतील ३ लाख ६० हजार ९५४ वाहनचालकांविरोधात जानेवारी ते डिसेंबर २०२१ मध्ये कारवाई केली आहे. २०२२ मध्येही असेच चित्र असून चार महिन्यांत ४८ हजार ७६३ वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून १० कोटी २१ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किवळी ते खंडाळा, अमृतांजन पूल अशा द्रुतगती मार्गावरील ५० किमीच्या हद्दीतील जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यांत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३ हजार ४३५ जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० कोटी ४१ लाख १ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. यातील ४८ हजार ७६२ वाहनचालक हे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे आहेत. या वाहनचालकांकडून सर्वाधिक १० कोटी २१ लाख १२ हजार रुपये दंड केला आहे.
गेल्या वर्षी, २०२१ मध्येही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. ४ लाख २४ हजार ९६१ जणांविरोधात जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान कारवाई झाली असून त्यांच्याकडून ३८ कोटी ४५ लाख ५९ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला.