मुंबईकरांच्या सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गात अचानक वाढ

लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्याच्या कालावधीत पावसाच्या मुक्कामाने तयार होणारे आजार, सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर ‘हीट’च्या अनुभूतीने शिंकेखोर , खोकलाळूंच्या जथ्थ्यात होणारी वाढ आणि आता ऐन थंडी मोसमात जाणवणारी तापमानाची विचित्र ‘थंडोष्ण’ परिस्थिती, यामुळे मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना ‘कफाळ’ बनवून टाकले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीची बोचरी थंडी आणि दिवसाचा अचानक असह्य़ करणारा उकाडा या वातावरणातील चकव्याचा परिणाम आजारांच्याही ऋतुबदलात झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या संसर्गाने पीडितांची रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.

सध्याचा काळ हा ऋतुबदलाचा कालावधी असून यामध्ये रात्रीचे घसरणारे तापमान आणि दिवसा चढणारा पारा यामुळे हवेतील विषाणूंचे प्रमाण वाढते. या वाढत्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाणामध्येही वाढ होते सध्या उपचाराकरिता येणारे बहुतांश रुग्ण हे वातावरणातील चकव्यांमुळे होणाऱ्या संसर्गाने बाधित आहेत, असे डॉ. केतन मेहता यांनी सांगितले.

डॉ. जयेश लेले यांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास संसर्गजन्य आजारांना बळी पडण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी या काळामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. दिवसाच्या वाढणाऱ्या उष्म्यामुळे घाम अधिक येत असतो, तेव्हा अशा वेळी बाहेरच्या ठिकाणी थंड पाणी, सरबत प्यायले जाते. यातील अशुद्ध पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. या काळामध्ये मुख्यत: लहान बालकांमध्ये कांजिणे या आजाराचे प्रमाण वाढत असते. तसेच ऋतुबदलाच्या या वातावरणामध्ये संसर्गजन्य आजारांमध्ये ताप येण्याचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

हे टाळा..

  • रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे.
  • उष्म्यापासून बचाव म्हणून बाहेरची सरबते पिणे.
  • सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानांतून औषधे खरेदी करणे.

हे लक्षात घ्या.. या काळात होणारा खोकला, सर्दी किंवा घशाचे आजार बरे होण्यासाठी किमान आठ दिवस लागतात. परंतु बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानांमधून अ‍ॅण्टिबायोटिक घेतात. या औषधांची गरज नसून गरम पाण्याची वाफ घेणे किंवा मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे अधिक फायदेशीर ठरते.

Story img Loader