Mira Road Viral Video: मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मीरा रोड येथील विनय नगर परिसरातील एका सोसायटीत बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा रक्षकासह ८ जणांच्या अंगावर गाडी घातली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. एसयूव्ही गाडीत बसलेला चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाने अनेक ठिकाणी धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सध्या या गाडीचा आणि आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमके प्रकरण काय?
आरोपींनी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मीरा रोड येथील सोसायटीत शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाने त्यांना कोणत्या फ्लॅटमध्ये जायचे असल्याचे सांगून ओळख विचारली. याचा राग आल्यामुळे एसयुव्हीमध्ये बसलेल्या चालकाने वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी सोसायटीच्या गेटजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपींकडे देशी कट्टा होता. कट्टा दाखवून त्यांनी सुरक्षा रक्षकाला म्हटले, “तुला जिल्हा गाझीयाबाद दाखवून देऊ”
सुरक्षा रक्षक राजेश्वर सिंह आणि त्यांचे सहकारी राकेश पवार यांनी सदर वाहन सोसायटीत आणण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे सांगितल्यानंतर वाहन चालकाने गाझीयाबादची धमकी देत वेगात वाहन चालवून अनेक ठिकाणी धडक दिली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यात स्पष्टपणे प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर गाडी घातल्याचे दिसत आहे.
या घटनेनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण आणि प्रत्यक्षदर्शींनी काढलेले व्हिडीओ ताब्यात घेण्यात आले आहेत. गाडी अंगावर चढविल्यामुळे सुरक्षा रक्षकासह काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे.