मुंबईतून हिंदू जनजागृती समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे पोलिसांच्या तावडीत
अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी मुंबईतून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. तीन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडावरून झालेली ही पहिलीच अटक असून या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती.
डॉ. तावडे याला शुक्रवारी दुपारी सीबीआय कार्यालयात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता त्याला अटक झाली. शनिवारी पुणे येथील सीबीआय न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे.
डॉ. तावडे हा सनातन संस्थेच्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे. सीबीआयने गेल्या बुधवारी, १ जूनला पनवेल येथील डॉ. तावडे याच्या तसेच पुणे येथील सारंग अकोलकर याच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केली होती तसेच त्यांना काही भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेलही मिळाले होते. या दोघांसह सर्व फरारी संशयितांना अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी पुण्यात दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेत केली होती. त्याच दिवशी सीबीआयने डॉ. तावडे याची कसून चौकशी केली होती. हत्या झाली त्या दिवशी आपण कुठे होतो, हे तावडेने सांगितले, मात्र त्याच्या मोबाइल लोकेशनवरून त्यात विसंगती आढळत होती. काही संशयित व्यक्तिंशी असलेल्या संपर्काबाबतही त्याला खुलासा करता आला नव्हता.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आल्यानंतर ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी सुरू होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक
मुंबईतून हिंदू जनजागृती समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे पोलिसांच्या तावडीत
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-06-2016 at 23:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virendra tawde arrested by cbi in narendra dabholkar murder case