अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी लटके यांचा नोकरीचा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त चहल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना चहल यांच्यावर दबाव असल्याचं मत व्यक्त केलं. ते बुधवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले, “आयुक्त नेमकी उत्तरं देत नाहीत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत नाहीही म्हणत नाहीत आणि होदेखील म्हणत नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं की राजीनामा मंजूर करणार असाल तर नामंजूर करा, पण का नामंजूर करत आहात ते लेखी द्या किंवा मंजूर करा.”
“कुणीतरी जाणीवपूर्वक वेळ पुढे ढकलण्याचा कानमंत्री दिला असावा”
“प्रशासन प्रश्नांची काहीच उत्तरं देत नाही. बघतो, करतो, बघू अशी उत्तरं दिली जात आहेत. याचा अर्थ वेळकाढूपणा करण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक वेळ पुढे ढकलण्याचा कानमंत्री दिला असावा,” असा आरोप विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.
“आयुक्तांना ३० दिवसाचा कालावधी कमी करण्याचे अधिकार”
ऋतुजा लटके यांनी ३ ऑक्टोबरला राजीनामा दिला. त्यामुळे ३० दिवसांची आमच्याकडे मुदत आहे, असं आयुक्तांकडून सांगण्यात येतंय. त्यावर महाडेश्वर म्हणाले, “एखाद्या कर्मचाऱ्याचा राजीनामा मंजूर करण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी असला तरी तो कालावधी कमी करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याने एक महिन्याचं वेतन भरलं, तर त्याला ती एक महिन्याची मुदत शिथिल करता येते. एक महिन्याचं वेतन कोषागारात भरल्यानंतर तर प्रश्नच उद्भवत नाही.”
“प्रशासनाने ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारलाच पाहिजे”
“आम्ही न्यायालयात जात आहोत. त्यावर न्यायालय निर्णय देईल. कारण ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे आणि प्रशासनाने तो राजीनामा स्वीकारलाच पाहिजे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीचं पालन आयुक्तांनी प्रशासनाचे प्रमुख म्हणून केलं पाहिजे. प्रशासन दबावात काम करत असेल, तर लोककल्याणकारी राज्य ही संकल्पना केवळ वाचण्यासाठीच आहे का? संविधानाचा इथं अवमान केला जात आहे,” असं मत महाडेश्वर यांनी व्यक्त केलं.
“जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा नामंजूर”
“प्रशासन जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करत नाही. या प्रकरणात कोण दबाव टाकत आहे हे महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील जनतेला माहिती आहे. असा दबाव टाकून महाराष्ट्रात लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या कृती घडत आहेत,” असा आरोप महाडेश्वरांनी केला.