प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने आज मुंबईमध्ये निर्भया पथकाचं उद्घाटन करण्यात आलं. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पालक मंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांच्या उपस्थितीत निर्भया पथकाचे उद्घाटन करण्यात आलं. या निर्भया पथकाचं काम कसं असेल त्याची रचना कशी असेल यासंदर्भातील माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.
मुंबईमधील ९१ पोलीस स्थानकांमध्ये हे पथक सक्रीय असल्याचं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. हे पथक प्रो अॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करणारं आणि रिअॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करण्याचं काम करत असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “हे पथक प्रोअॅक्टीव्ह आणि रिअॅक्टीव्ह दोन्ही पद्धतीचं पोलिसिंग करणार आहे. क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा एक प्लॅन या पथकाकडे देण्यात आलाय. सुरक्षित असल्यासंदर्भातील भावना वाढणं हे या पथकाकडून अपेक्षित आहे,” असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
“समाजकंटक, महिलांची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई हे पथक करेल. तसेच जनजागृती आणि शिक्षण देण्याचंही काम पथकाकडून केलं जाईल. शाळा कॉलेजमध्ये जाऊन कार्यक्रमांच्या माध्यमामधून सुरक्षित वातावरण तयार करण्याचं काम हे पथक करेल,” असं विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं.
निर्भया पथकाचा नक्कीच फायदा होईल असं विश्वास नागरे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई सुरक्षित शहर आहे. पण या नवीन पथकाच्या माध्यमातून महिलांसंदर्भातील तक्रारींबद्दलची प्रक्रिया गतिमान होईल असंही ते यावेळी म्हणाले.
१०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार
अर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करणार असून मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबुक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.