विश्वास पाटील यांची ‘झोपु’ प्राधिकरणात वर्णी
काँग्रेस राजवटीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या खपामर्जीमुळे काहीकाळ अडगळीत पडलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी पानिपतकार विश्वास पाटील यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (एसआरए) वर्णी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सरकारनिष्ठेचे फळ दिल्याची जोरदार चर्चा शुक्रवारी मंत्रालयात रंगली होती.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आपली वर्णी लागावी यासाठी सनदी अधिकारी फार उत्सुक असतात. साहजिकच आजवर या महत्त्वाच्या पदावर राजकीय मंडळींच्या विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील किंवा मोठे राजकीय पाठबळ असलेल्या सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागल्याचे दिसते.
असीम गुप्ता यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी काही अधिकारी प्रयत्नशील होते. अनेकांनी आपल्या राजकीय संबंधाचा वापर करीत ही जागा मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनी आज विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची या पदावर नियुक्ती करून इच्छुक अधिकाऱ्यांचा पत्ता कट केला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यात जोरदार विरोध झाल्यानंतर पाटील यांनी आपल्या सनदी सेवेची तत्त्व बाजूला ठेवत सरकारचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला. पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या राजकारणी, साहित्यिकांचा समाचार घेताना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे साहित्यातील दहशतवादी असल्याची जाहीर टीका केली होती. त्यानंतरही पाटील यांनी वेळोवेळी सरकारच्या भूमिकेचे उघड समर्थन केले. त्यांच्या या सरकारनिष्ठेमुळेच त्यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागल्याची चर्चा मंत्रालयात ऐकावयास मिळत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा