पॅगोडा म्हणजे बौद्ध धर्मीयांचे ध्यानकेंद्र. चीन, जपान, म्यानमार, कोरिया, श्रीलंका या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती मुंबईत गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे. सुवर्णरंगी आणि गगनभेदी असलेला हा पॅगोडा सध्या मुंबईकरांचे आकर्षण ठरलेला आहे.

मुंबईमध्ये पर्यटनाची ठिकाणे म्हटली की, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव-जुहू चौपाटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणीचा बाग हीच आकर्षक व निसर्गरम्य ठिकाणे डोळ्यासमोर येतील. मात्र गोराई येथील पॅगोडा आता मुंबईकरांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ ठरले आहे. शहरी धकाधकीपासून दूर असलेला निसर्गाच्या सान्निध्यातील या पॅगोडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात. सुटीच्या दिवशी तर त्यांची संख्या अधिकच असते.

Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

बोरिवलीहून गोराई खाडीजवळ आलात तर खाडीकिनारी असलेला आकाशात भिडणारा भव्य स्तूप आपले लक्ष वेधून घेतो. जसे जसे जवळ जाल, तसे या स्तुपाची भव्यता अधिकच व्यापक दिसते. एस्सेल वर्ल्डजवळ असलेला हा स्तूप म्हणजेच ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा.’ सुवर्णरंगी असलेला हा पॅगोडा म्हणजे म्यानमारमधील ‘श्वेडॅगन’ पॅगोडाची प्रतिकृती. तब्बल ३२५ फूट उंच असलेला हा आशिया खंडातील सर्वात उंच पॅगोडा आहे. या पॅगोडाचे घुमटच २८० फूट व्यासाचे आहे. म्हणजे विजापूरमधील प्रसिद्ध गोल घुमटपेक्षा तिपटीने मोठे. विशेष म्हणजे एकही खांब न उभारता आणि लोखंडाचा उपयोग न करता केवळ दगडात ते बांधण्यात आले आहे. या घुमटाच्या निर्मितीसाठी बेसॉल्ट आणि जोधपुरी दगड वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ६०० ते ७०० किलोचे दगड एकमेकांत गुंफून हा घुमट बनवण्यात आला आहे. घुमटावरून आकाशात झेपावणारा निमुळता होत गेलेला सुळका अतिशय मनोहारी वाटतो. त्यावर केलेले नक्षीकाम अतिशय मनोहारी आहे. आधुनिक व प्राचीन वास्तूशिल्पाचा मिलाफ येथे पाहायला मिळतो.

पॅगोडा परिसरात फिरण्यासारखे खूप काही आहे. एक विशिष्ट प्रकारची भलीमोठी घंटा आणि नगारा घेऊन उभे असलेल्या धम्मसेवकांचे पुतळे लक्ष वेधून घेतात. त्याशिवाय पॅगोडाबाहेरील शांतचित्त बसलेली भव्य आणि सुबक बुद्धमूर्ती पाहिल्यानंतर प्रसन्नतेची अनुभूती मिळते.

वर जाण्यासाठी संगमरवरी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून अनवाणी चालताना अतिशय थंडगार वाटते. आतमधील सभागृह अतिशय भव्य असून तिथे एकाच वेळी तब्बल पाच हजार लोक ध्यानधारणेसाठी बसू शकतात. सभागृहाच्या चोहोबाजूने काच लावली असून एक मोठे धम्मचक्र आहे. सभागृहाच्या मध्यभागी गोलाकार व्यासपीठ असून, त्यावर बसून धम्मगुरू उपदेश करतात.

याच परिसरात आणखी दोन पॅगोडा आहेत. एक ९० फूट उंचीचा पॅगोडाही लक्षवेधक आहे. एका पॅगोडाच्या जवळ अशोकस्तंभ उभारण्यात आलेला आहे. पॅगोडाच्या पायऱ्यांवरून गोराई खाडीचे मनमोहक रूप दिसते.

या पॅगोडामध्ये एक आर्ट गॅलरी असून तिथे तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित आकर्षक चित्रे आहेत. गौतम बुद्ध यांचे संदेशही सर्वत्र लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय ऑडिओ व व्हिडीओ गॅलरीही येथे उभारण्यात आलेली आहे.

निसर्गाच्या सान्निध्यातील या पॅगोडाला भेट दिल्यावर आपल्याला आध्यात्मिक व मानसिक शांती लाभेल. दररोजच्या धकाधकीच्या जीवनापासून आणि शहरी गोंगाटापासून दूर असलेला हा पॅगोडा परिसर मानसिक समाधान देतो.

कसे जाल?

ग्लोबल विपश्यना पॅगोडा

बोरिवलीहून बसने गोराई खाडी येथे जाता येते. तेथून एस्सेल वर्ल्डकडे जाणाऱ्या बोटीने पॅगोडा येथे जाता येते.

मढ आयलंडहूनही पॅगोडाकडे जाणाऱ्या बोट सुटतात.

मीरा-भाईंदरजवळील उत्तनहून एस्सेल वर्ल्डकडे जाणाऱ्या एसटी बस आहेत.