शनिशिंगणापूरप्रकरणी पंकजा मुंडे यांचा सवाल
शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असेल तर तो महिलांचा अपमान यांचा अपमान कसा, असा सवाल माहिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. काही प्रथा-परंपरा असतात, त्यामुळे हा मुळात वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही, आपण विनाकारण याला जास्त महत्त्व देतो, असे सांगत मुंडे यांनी हा विषय जास्त गांभीर्याने घेत नसल्याचे सूचित केले.
शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. मात्र, गेल्याच आठवडय़ात एका महिलेने चौथऱ्यावर चढून शनीचे दर्शन घेतले. त्यामुळे गहजब उडाला. या घटनेच्या निषेधार्थ शनिशिंगणापुरात बंद पाळण्यात आला. तसेच दुग्धाभिषेकाने चौथऱ्याचे शुद्धीकरणही करण्यात आले. त्याच्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या सर्व पाश्र्वभूमीवर मंत्रालयात गुरुवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांचे या घटनेकडे लक्ष वेधले असता, त्यांनी वरीलप्रमाणे सवाल उपस्थित केला. तसेच महिलांच्या प्रवेशबंदीसंदर्भात काही प्रथा-परंपरा असतात त्यामुळे हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही, असेही मुंडे म्हणाल्या. मंदिरात पुरुषांना जाता येते, परंतु महिलांना प्रवेशबंदी असणे हा स्त्री-पुरुष समानतेशी संबंधित हा प्रश्न नाही का, असे विचारले असता, हा तसा वाद नाही, असे त्या म्हणाल्या. मुलीला जन्मालाच न येऊ देणे, शिक्षण व नोकऱ्यांमध्ये महिलांना संधी न देणे हा विषय स्त्री-पुरुष समानतेचा आहे, असे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले.
पंकजा मुंडे म्हणाल्या..
’माझ्या जन्माच्या आधीपासून शनी मंदिरात जाण्यास महिलांना बंदी आहे. हनुमानाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात महिला जात नाहीत
’हनुमान हा शनीचा अवतार असल्याचे म्हटले जाते, परंतु त्याबद्दल मला जास्त माहिती नाही
’शनी किंवा हनुमान मंदिरात महिलांना जाण्यास बंदी असेल, तर त्यात मानापमान मानण्याचे काही कारण नाही, हा परंपरेचा प्रश्न आहे, त्यासाठी हट्ट तरी कशाला करायचा?