ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सन्मानार्थ ‘हृदयेश आर्ट्स’ संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘हृदयनाथ’ पुरस्कार प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या १२ एप्रिल रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात होणाऱ्या खास कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आनंद यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये आणि गौरवचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
आनंद यांचा मुंबईतील हा पहिलाच जाहीर सत्कार असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, आमिर खान हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात रघुनंदन गोखले व रवी अभ्यंकर हे ‘विश्वनाथन आनंद आणि बुद्धिबळ’ या विषयावर बोलणार आहेत. भाषणे व सत्कार सोहळ्यानंतर आनंद आणि उपस्थित श्रोते यांच्यात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश भिमाणी हे करणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात डी. जे. प्रसाद, अनुपमा गोखले, रोहिणी खाडिलकर, प्रवीण व भाग्यश्री ठिपसे, रघुनंदन गोखले, देवेंद्र जोशी, अंजली भागवत, कमलेश मेहता, धनराज पिल्ले, अरुण केदार, प्रणाली धारिया, छाया पवार या खेळाडूंचा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
हृदयेश आर्ट्सला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यंदा दोन जणांना हा पुरस्कार देण्याचे संस्थेने ठरविले होते. यातील पहिला पुरस्कार संगीतकार ए. आर. रेहमान यांना प्रदान करण्यात आला आहे. आता दुसरा पुरस्कार आनंद यांना प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून विनामूल्य प्रवेशिकांसाठी ९ एप्रिलनंतर अविनाश प्रभावळकर यांच्याशी ०२२-२६१४८५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader