किमतीवर आणलेले नियंत्रण आणि कच्च्या मालाची कमतरता कारणीभूत

मुंबई : ‘क’ जीवनसत्त्वासाठी दिल्या जाणाऱ्या सेलीन किंवा लिमसी या ब्रॅण्डच्या गोळ्यांचा मागील सहा महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाकडून (एनपीपीए) गोळ्यांच्या किमतीवर आणलेले नियंत्रण आणि गोळ्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल पुरविणाऱ्या चीन देशातील कंपन्यांवर आलेले निर्बंध यामुळे गोळ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाली असल्याचे सांगितले जाते.

‘क’ जीवनसत्त्वासाठी डॉक्टर बहुतांश वेळा लिमसी किंवा सेलीन या ब्रॅण्डच्या गोळ्या लिहून देतात. मात्र या गोळ्या मागील सहा ते सात महिन्यांपासून बाजारामध्ये उपलब्ध नाहीत. वारंवार संसर्गजन्य आजार होणाऱ्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी तसेच क जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी या गोळ्या दिल्या जातात. कित्येक महिन्यांपासून या गोळ्यांचा पुरवठा कमी प्रमाणात असल्याने रुग्णांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आता एकापेक्षा अधिक बॅ्रण्डची नावे लिहून देणे सुरू केले असल्याचे फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.

गेले दोन महिने तर सेलीन गोळी आलेलीच नाही. नियमितपणे ही गोळी घेणारे ग्राहक वारंवार गोळ्यांची चौकशी करत आहेत. जेनरिक औषधे उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांना नेहमीच्याच कंपन्यांची गोळी हवी असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे, असे ठाण्यातील औषध विक्रेत्या रिंकू जाधव यांनी सांगितले. मुंबईतच काय देशभरात या औषधांचा मागील सहा महिन्यांपासून ‘क’ जीवनसत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आहे. १२ रुपयांच्या गोळ्यांच्या पाकिटासाठी १०० रुपये रिक्षाला खर्च करून ग्राहकाला गोळी मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, असे रिटेल अ‍ॅण्ड डिस्पेिन्सग केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद दानवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सेलिन गोळी ग्लॅक्सो आणि लिम्सी गोळी अ‍ॅबॉट फार्मा कंपनीमार्फत उत्पादित केली जाते. गेल्याच वर्षी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाकडून या गोळ्यांच्या किमतीवर निर्बंध आणण्यात आले असून जवळपास निम्म्याने यांच्या किमती कमी केल्या. सेलीनच्या २५ गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १८ रुपये आहे, तर लिम्सीच्या १५ गोळ्यांच्या पाकिटाची किंमत १४ रुपये आहे. त्याच वेळी सेट्राविट या १५ गोळ्यांचे पाकिट मात्र ६५ रुपयांना आहे.

बहुजीवनसत्त्वाची कोबाडेक्स ही गोळीसुद्धा बाजारामध्ये सध्या उपलब्ध नाही, अशी माहिती महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली.

झाले काय?

जीवनसत्त्वांच्या गोळ्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल चीन देशातील कंपन्यांमधून आयात करण्यात येतो. चीनमधील प्रदूषण विभागाकडून कच्चा माल तयार करणाऱ्या कंपन्यांवर निर्बंध आणले. त्यामुळे या कंपन्यांकडून निर्यात होणारा कच्चा माल जवळपास बंद झाला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे एकीकडे कच्च्या मालाची कमतरता आणि दुसरीकडे औषधांच्या घटत्या किमती यामुळे या कंपन्यांना औषधांचे उत्पादन परवडत नसल्याने आवक घटली असल्याचे डोंबिवलीतील अखिल भारतीय मानवी हक्क आयोग असोसिएशनचे ठाणे विभागाचे सचिव आणि औषध विक्रेते दीपक बरई यांनी सांगितले.

Story img Loader