लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा फणसाळकर यांच्याकडे असणार आहे.

भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ तुकडीतील अधिकारी असलेले फणसळकर हे पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलातील सुमारे ५० हजार पोलिसांचे ते नेतृत्व करत आहेत. फणसळकर त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर ते कार्यरत होते. त्या आधी फणसळकर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. सुमारे पावणेदोन वर्षे त्यांनी ठाणे शहर आयुक्तपदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जिवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

आणखी वाचा- नागरिकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव अनेक समस्यांचे मूळ; ‘लोकसत्ता शहरभान’मध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे प्रतिपादन

याशिवाय त्यांनी मुंबईतही महत्त्वाच्या पदांवर यापूर्वी काम केले आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणून फणसळकर यांनी काम केले होते. मुंबईत पोलीस सहआयुक्त (प्रशासन) या पदाचाही कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. फणसळकर यांची पहिली नियुक्ती अकोल्याचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी वर्ध्याचे व परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. नाशिकचे उपायुक्त ही त्यांची आयुक्तालयातील पहिली नियुक्ती होती. त्यानंतर, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek phansalkar has additional charge of the post of director general mumbai print news mrj