स्वामी विवेकानंद यांचे एक भाषण आहे, ‘तरुणांना आवाहन’ यात त्यांनी समर्थ भारताविषयी एक भाष्य केले आहे. स्वामी विवेकानंदानी आपल्या भाषणात तरुणांकडून व्यक्त केलेल्या आशा-आकांक्षा व समर्थ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डोंबिवलीमधील ‘विवेकानंद सेवा मंडळा’ने गेली पंचवीस वर्षे ज्ञानयज्ञ चालवला आहे. केवळ आदर्शाच्या गप्पा न ठोकता स्वत:पासून आदर्श निर्माण करून समाजात नवी मूल्ये रुजविण्याचे काम ही संस्था करत आहे. गोरगरीब मुलांना शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. रोजगारासाठी मार्गदर्शन करण्यापासून उद्योग उभारणीसाठी मदत करणाऱ्याही अनेक संस्था आहेत. तथापि हे काम करत असतानाच सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्ती व चारित्र्यसंपन्नतेचे संस्कार देण्याचे काम विवेकानंद सेवा मंडळाकडून केले जाते.
स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून त्यांच्याच नावाने निर्माण झालेल्या या संस्थेचा प्रवासही प्रेरणादायी आहे. २५ वर्षांपूर्वी व्हीजेटीआयमधील प्राध्यापक सुरेश नाखरे आणि वनवासी कल्याण आश्रम केंद्राचे विष्णू मामा देवस्थळी यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घेऊन ही संस्था स्थापन केली. यामागचा उद्देश असा होता की, समाजातील हुशार विद्यार्थी समाजकार्यात मनापासून उतरल्यास वेगाने समाजाची प्रगती होऊ शकेल. हुशार तरुणांनाही केवळ स्वत:चा स्वार्थ न जपता समाजासाठी काम केले पाहिजे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा हुशार तरुण जर या ज्ञानयज्ञात उतरला तर त्यातून अनेक चांगले उपक्रम समाजासाठी राबवता येतील आणि त्यातून सशक्त भारत तयार होण्यास मदत होईल. समाजातील हा अभिजन वर्ग चारित्र्यसंपन्न व राष्ट्रभक्त बनून कार्यरत झाला तर त्यातून बलशाली व गौरवशाली भारत निर्माण होण्यास मदत होईल.
अभियांत्रिकी क्षेत्रातील आदर्श अध्यापक म्हणून ख्यातकीर्त असलेल्या प्राध्यापक नाखरेसरांनी व्हीजेटीआयमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडविल्या आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी आज जगभरातील मोठमोठय़ा संस्थांमध्ये मानाच्या पदावर आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील या तरुणांसाठी एक व्यासपीठ उभे करून या तरुणांना सामाजिक कार्याकडे वळविण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यात प्राध्यापक नाखरे व विष्णू देवस्थळी यांनी केला. त्यासाठी डोंबिवली पूर्व येथे ‘अभियांत्रिकी वाचनालय’ सुरू केले. सुरुवातीला दहा-बारा विद्यार्थी याचे सदस्य बनले होते. आता या वाचनालयात आठ हजारांहून अधिक पुस्तके असून जवळपास अडीच हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. यातून अभियांत्रिकी तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीचे रोपटे रुजविण्याचे काम सुरू झाले. ज्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच काही वेगळे काम करण्याची इच्छा होती. अशा तरुणांचा गट करून त्यांना ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी भागांमध्ये नेऊन तेथील परिस्थितीचे आकलन करून दिले जाऊ लागले. आपल्याच समाजाचा भाग असलेल्या आदिवासींचे कष्टप्रद जीवन बघून यातील अनेक तरुणांनी विवेकानंद सेवा मंडळात काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आदिवासी मुलांबरोबर राहून त्यांचे प्रश्न समजावून घेतले जाऊ लागले. त्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रांमध्ये जाऊन सामाजिक काम कसे केले जाते ते दाखवले गेले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यापूर्वी खेडे अथवा आदिवासी भाग कधी बघितलेलाच नव्हता. समर्थ भारताचे स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी हुशार तरुणांनाही मोठय़ा संख्येने पुढे येऊन सामाजिक कार्यात उतरण्याची गरज आहे हे या मुलांच्या लक्षात येऊ लागले आणि पाहता पाहता संस्थेचे काम वाढू लागले. एकापाठोपाठ एक अनेक चांगले उपक्रम विवेकानंद सेवा मंडळाने हाती घेतले. केतन बोंद्रे, वरिंद्र वारंग, दिनेश मोरे, प्रग्नेश लोढाया, कुणाल म्हात्रे अशा तरुणांनी संस्थेच्या कामाची जबादारी स्वीकारली. आज हेच तरुण संस्थेचे आधारस्तंभ बनले आहेत.
शहापूरमधील विहीगाव येथे गेली पंधरा वर्षे शिक्षण, आरोग्य आणि पाणीप्रश्नावर संस्थेचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग घेण्याबरोबर ‘झेप’ या प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक कारणांसाठी ज्यांना शिक्षण घेता येत नाही अशा मुलांच्या फीपासून गणवेशापर्यंत सर्व भार संस्था उचलते. अनेक विद्यार्थ्यांना ‘एमए’ म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचाही खर्च संस्थेने केला आहे. वाडा तालुक्यातील खोडदे गावीही शिक्षण, आरोग्य व पाणी उपक्रम सुरू आहे. शेतीला पाणी मिळावे यासाठी वनराई बंधारे, पक्के बंधारे, विहिरींची डागडुजी, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरींमधील गाळ काढणे असे अनेक उपक्रम करताना लोकांमधील सांघिक शक्ती जागृत करण्याचे काम केले जाते. ठाणे जिल्ह्य़ातील खोडदे, विहीसारख्या आदिवासी भागातील गावांमध्ये महिला बचतगट तयार करणे, आधुनिक भातशेतीचे तंत्र समजावून उत्पन्न वाढवणे, तरुणांना लघुउद्योगनिर्मितीसाठी मार्गदर्शन व मदत करण्याचे काम विवेकानंद सेवा मंडळाचे तरुण नियमितपणे करत असतात. ग्रामीण-आदिवासी भागातील उपक्रमांबरोबरच शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी नालंदा प्रकल्प, वाचनपेटी प्रकल्प तसेच संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. नालंदा प्रकल्पांतर्गत डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढविण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून शिक्षणाचा उपक्रम राबवला जातो. जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना गणित, इतिहास, विज्ञान आणि इंग्रजी विषय शिकतात. यात एलईडी स्क्रीन आणि डीव्हीडीचा वापर केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानपाडा भागातील या जिल्हा परिषदेच्या शाळेत कालपर्यंत कुणी विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसला नव्हता. आता येथील विद्यार्थ्यांमध्ये स्कॉलरशिप परीक्षेला बसण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. एका विकलांग शाळेतही विद्यार्थ्यांना शिकविण्याचा, त्यांचा आत्मविश्वास बळकट करण्याचा उपक्रम चालवला जात आहे. याचप्रमाणे संस्कार वर्ग व वाचनपेटी उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड व त्यातून चांगले संस्कार घडविण्याचे काम गेली काही वर्षे केले जाते. शाळेच्या गरजेनुसार ही योजना राबवली जाते. साधारणपणे एका पेटीतीून शंभर छोटी पुस्तके दिली जातात.
विद्यार्थ्यांनीच या पेटीची जबाबदारी घ्यायची व पुस्तके वाचण्यासाठी द्यायची. या उपक्रमाचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू लागली. हे वेगवेगळे उपक्रम राबविताना स्वामी विवेकानंद यांचे समर्थ भारताचे स्वप्न कसे साकार करता येईल, तरुणांना चांगल्या कार्याकडे कसे वळवता येईल, प्रामाणिकपणा, त्याग, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती कशी रुजवता येईल, याकडे विवेकानंद सेवा मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांचे लक्ष असते. संस्थेमध्ये आज किमान सव्वाशे कार्यकर्ते आहेत. त्यातील बहुतेकांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून स्वत:चा वेळ आणि खिसा खाली करून समाजाची सेवा करत आहेत.
विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली
संपर्कासाठी- केतन बोंद्रे- ९८३३९३००३२