प्रक्रिया थांबविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवदेन
तंत्रज्ञान शिक्षणातील अग्रगण्य संस्था अशी ओळख असलेल्या माटुंगा येथील वीर जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत (व्हीजेटीआय) सध्या सुरू असलेल्या अध्यापक भरती प्रक्रियेत मूळ कागदपत्रांची तपासणी न करताच काही क्षुल्लक कारणांवरून ६५ टक्के अर्ज बाद करण्यात केले आहेत. यामध्ये संस्थेतील काही प्राध्यापकांचाही समावेश आहे. याचबरोबर भरतीप्रक्रियेसाठीच्या निवड समितीमध्ये वरिष्ठांना डावलण्यात आल्याने याबाबतही आक्षेप नोंदविण्यात येत आहे. हा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला असून ही प्रक्रिया थांबविण्यासाठी उमेदवारांना मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
संस्थेतील ३९ जागांसाठी २४ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी एकूण ५५७ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ३६५ अर्ज निवड समितीने क्षुल्लक कारणांवरून रद्द केले. रद्द करण्यात आलेल्या अर्जापैकी ७६ अर्ज हे प्रक्रिया शुल्क भरले नाही म्हणून रद्द केले होते. यातील ३५ जणांनी ऑनलाइन पैसे न भरता ‘डिमांड ड्राफ्ट’ने भरले होते. पण रक्कम ऑनलाइनच भरावी, असे कारण त्या उमेदवारांना देण्यात आले होते. पण ऑनलाइन प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी येत होत्या म्हणून डिमांड ड्राफ्टने रक्कम भरली असून ती स्वीकारून अर्ज विचारात घ्यावा अशी विनंती उमेदवारांनी केली होती ती संस्थेने विचारात घेतली नाही. वयाचा पुरावा नाही, असे कारण देत १२८ अर्ज रद्द करण्यात आले; तर १०४ अर्ज रीतसर पद्धतीले आले नाहीत म्हणून रद्द करण्यात आले. शैक्षणिक पात्रता नाही म्हणून ४९ अर्ज आणि इतर कारणांसाठी ५५ अर्ज रद्द करण्यात आले आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. संस्थेत काम करत असलेल्या ज्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता त्यांनी संस्थेकडे अर्ज करण्यासाठी ‘ना हरकत पत्र’ मिळावे यासाठी अर्ज केला होता. ते पत्र मुलाखतीपूर्वी सादर केले गेले असते. मात्र ते पत्र नाही म्हणून अर्ज रद्द ठरविण्यात आले. याचबरोबर याच समितीने रीतसर पद्धतीने न आलेले काही अर्ज कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी ग्राहय़ धरल्याचा आरोपही उमेदवार आणि प्राध्यापकांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
निवड समितीमध्ये विभागप्रमुखांना डावलून सहयोगी प्राध्यापक एस. जी. भिरुड तसेच याचबरोर प्राध्यापक डी. एस. वाव्हळ यांचा समावेश प्रत्येकी तीन विषयांच्या समितीमध्ये करण्यात आला आहे. यामुळे संस्थेतील अध्यापकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याचबरोबर या अध्यापकांची निवड करताना इतर वरिष्ठ अध्यापकांची समितीत येण्याची क्षमता नव्हती का, असा प्रश्नही अध्यापक विचारत आहेत. यासर्व प्रकारासंदर्भात संस्थेचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांच्याशी कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader