अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीच्या ‘पीसीएम’ या विषयगटातील ‘रसायनशास्त्र’ या विषयाला व्होकेशनल विषयांचा पर्यायही ग्राह्य़ धरण्याचा निर्णय या वर्षीपासूनच अंमलात आल्यास ४५ टक्क्य़ांची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यास असमर्थ ठरलेल्या काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटीबरोबरच इयत्ता बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयगटात किमान ४५ टक्के गुण असणे बंधनकारक आहे. परंतु, विज्ञान व गणिताच्या यंदापासून लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमामुळे विषयगटात किमान ४५ टक्क्य़ांपर्यंतची मजल मारणेही अनेक विद्यार्थ्यांना शक्य झालेले नाही. त्यामुळे, सीईटीत कितीही गुण असले तरी ४५ टक्क्य़ांच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी प्रवेशाची संधी हुकणार होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिलेल्या एका निकालात पीसीएममधील रसायनशास्त्र या विषयाला व्होकेशनल विषय ग्राह्य़ धरण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकसास्त्र या पारंपरिक विषयांपेक्षा कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल मेटेनन्स, आयटी हे व्होकेशनलचे विषय स्कोरिंग असतात. त्यामुळे विषयगटातून रसायनशास्त्र वगळून त्यात व्होकेशनल विषयाचे गुण समाविष्ट केल्यास अनेक विद्यार्थी ४५ टक्क्य़ांची ‘मॅजिक फिगर’ गाठू शकतील. त्यामुळे, हा निर्णय काठावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. याबाबत न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vocational options for chemistry subject granted
Show comments