मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बुधवारी धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे बहुसंख्य मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोहोचली नसल्यामुळे मतदान केंद्रात पोहोचल्यानंतर अनेकांना आपला अनुक्रमांक व नाव मतदारयादीत शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील प्रभादेवीमधील खेड गल्लीतील मुंबई पब्लिक स्कूल मतदान केंद्रावर जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले; मात्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता तेथे आल्यानंतर आपले मतदान केंद्र बदलल्याचे समजले. त्यामुळे दिव्यांग महिलेला एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रापर्यंत पायपीट करावी लागली.
मुंबईत ठिकठिकाणच्या मतदारसंघात मतदारयादीत त्रुटी पाहायला मिळत आहेत. प्रभादेवी – दादर परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतदार संगीता भास्कर राणे यांनी सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी प्रभादेवीमधील खेड गल्ली येथील मुंबई पब्लिक स्कूल मतदान केंद्रावर येऊन मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीसाठी त्या आज त्याच मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान केंद्र बदलल्याचे त्यांना समजले. यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नसल्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागल्याचे संगीता राणे यांनी सांगितले. त्यांचे मतदान केंद्र आता खेडगल्लीऐवजी गोखले रोडवरील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत असल्याचे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी गोखले रोडवरील महापालिकेची शाळा गाठली.
हेही वाचा >>> Maharashtra Elections 2024 : घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी केले एकत्रित मतदान
‘लोकसभा निवडणुकीसाठीखेडगल्लीतील मतदान केंद्रावर मतदान केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी याच मतदान केंद्रावर आले. मात्र मतदानासाठी आल्यानंतर मतदान केंद्र बदलल्याचे सांगण्यात आले. तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरीच मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरी येऊन अर्जही भरला होता. मात्र सदर अर्ज पुढे गेलाच नाही. त्यामुळे मी पुन्हा लोकसभेसाठी जिथे मतदान केले, त्याच ठिकाणी विधानसभेसाठी मतदान करायला आले. मात्र मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्र बदलल्याचे समजणे ही एका दिव्यांग मतदारासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींच्या सोयी-सुविधांवर लक्ष देणे गरजेचे आहे’, असे मत संगीता राणे यांनी व्यक्त केले.