मुंबई: मतदारांमध्ये सकाळपासून चांगला उत्साह होता. शिवसेनेला (ठाकरे गट) भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात होती. कडाक्याच्या उन्हात बराच वेळ रांगेत उभे राहिल्याने निराश मतदार माघारी गेले. वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असून आयोगाने मोदींच्या घरगड्यासारखे काम केल्याचा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Lok Sabha Polls Phase 5 : पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावे मतदार यादीतून गायब!

पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा ‘खेळ’ खेळल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने मोबाइलवर संदेश पाठवत होते. मात्र मतदानाला गेलेल्या मतदारांचा छळ केला गेला. वास्तव्याचा दाखल्यासाठी विविध पुरावे मागितले जात होते. मतदान केंद्रावरील ढिसाळ नियोजन जागोजागी दिसून येत होते. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. मतदानाला जाणूनबुजून विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे घेऊन ठेवा. त्यांना क्षमा केले जाणार नाही. त्यांची नावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली जातील. त्यांच्यावरील कारवाईसाठी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting process delayed deliberately allegation by uddhav thackeray on election commission zws