मुंबई : मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे वडाळा येथील वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला. या प्रकरणाची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली असून झोपु प्राधिकरणाने मंगळवारी विकासकावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.
वडाळ्यातील बरकत अली नगर येथील गणेश सेवा झोपु प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे काम पूर्ण झाले होते. तर वाहनतळ उभारण्याचे काम सुरू होते. यासाठी लोखंडी सांगाडा उभारण्यात आला होता. त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. मुंबईत सोमवार दुपारी वादळी वारा वाहू लागला आणि दुपारी ४.१५ च्या सुमारास हा सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. या घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेसह झोपु प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोखंडी सांगाड्याचे अवशेष हटविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. हे काम रात्रभर सुरू होते. सकाळी १० च्या सुमारास सांगाड्याचे अवशेष हटविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती झोपुतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अवशेष हटविल्यानंतर बरकत अली नगर येथील वाहतूक सुरळीत झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वडाळा दुर्घटनेनंतर झोपु योजनेतील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. झोपु प्राधिकरणाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच विकासक न्यूमेक कंपनीवर मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आठ दिवसात विकासकाने यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. आठ दिवसात यावर काय उत्तर येते यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.