हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान जुलै २०२१ मध्ये एका व्यक्तीचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देणारा मुख्य आरोपी विकास उर्फ आशाराम स्वामीदयाल पासवान याला वडाळा रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली.टिळकनगर येथे राहणारा अजय कुमार सिंग याला जुलै २०२१ रोजी तीन-चार जणांच्या टोळीने लाकडी सळीने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपला भाऊ अजय कुमार सिंगचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकण्यात आल्याची तक्रार प्रदीप सिंग याने वडाळा पोलीस ठाण्यात केली.

हेही वाचा >>> “मग घ्या ना धौती योग”, आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला; ‘थापां’चाही केला उल्लेख!

वडाळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान ऑगस्ट २०२१ रोजी सानपाडा येथून आरोपी जॉन आदिमलंग हरिजन (२३) आणि उत्तर प्रदेश येथून आरोपी अखिलेश कुमार दुबे (३४) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि अन्य एका साथीदाराचा शोध रेल्वे पोलीस घेत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपी विकास कळव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा परिसरातून आरोपी विकासला मंगळवारी अटक केली. तसेच, अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांनी दिली.

Story img Loader