चार दिवसात २२५ खासगी बस गाडय़ांच्या तपासणीत परवाना नसताना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०१ बस चालकांवर वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय १० बस चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यंत्रणा सातत्याने कोलमडत असल्याने खासगी वाहतूकदार ‘कार्यरत’ झाले आहेत. यात नियमांना पायदळी तुडवत खासगी बस वाहतूकदार प्रवासी वाहतूक करत आहेत. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे खासगी प्रवासी वाहतूकदार मंडळींचे दलाल थेट एसटी डेपोत शिरून प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळवताना पाहायला मिळत आहे.
अनेकदा डेपोत जात असलेल्या प्रवाशांना रस्त्यातच अडवून व कमी प्रवास भाडय़ाचे आमिष दाखवून खासगी वाहतूकदार सर्वसामान्य प्रवाशांना आपल्याकडे खेचत असल्याचे आढळून आले. अशाच बस चालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार व मोटार वाहन कायद्यानुसार एसटी बस स्थानकाच्या २०० मीटर क्षेत्रात खासगी प्रवासी वाहने उभी केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय एसटीच्या अधिकृत थांब्यावर खासगी वाहने उभी केल्यास कारवाई केली जात आहे. तर खासगी वाहनाची योग्य देखभाग, दुरुस्ती न करता प्रवासी वाहतूक केल्यास कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा