मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ स्थापत्य खर्चात झाली असून यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १५ हजार ८०० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे.
मुंबई आणि ठाण्याला मेट्रोने जोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’चे काम हाती घेतले आहे. ३२.३२ किमी लांबीच्या या मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी २६३२.२५ कोटी रुपये खर्च स्थापत्य कामांचा आहे. या मार्गिकेच्या कामाचे कंत्राट २०१८ मध्ये आर इन्फ्रा-अस्टाल्डी आणि सीएचईसी-टीपीएल कंपन्यांना देण्यात आले असून त्यानंतर या कंपन्यांनी कामाला सुरुवात केली. कंत्राटानुसार ३० स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम जुलै २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी आता कंत्राटदारांना ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘एमएमआरडीए’कडे ‘मेट्रो ४’ संबंधी माहिती मागितली होती. त्यातूनही ही माहिती समोर आली आहे.
प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला असून परिणामी मार्गिकेच्या प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचेही माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उघडकीस आले. ‘मेट्रो ४’च्या स्थापत्य खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १४ हजार ५४९ वरून वाढून १५ हजार ८०० रुपयांच्या घरात गेला आहे. कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र एमएमआरडीएने अद्यापही कारवाई केलेली नाही. प्रकल्पास विलंब करणाऱ्यांविरोधात ‘एमएमआरडीए’ने त्वरित दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.