* दीड तासांचा प्रवास अवघ्या १६ मिनिटांत
* गाडीची क्षमता ४८० प्रवासी वाहून नेण्याची
* गुलाबी रंगांची चार डब्यांची गाडी
* याच वर्षी ऑगस्टपासून प्रवाशांना लाभ घेता येणार
दुपारी साधारण दीडचा सुमार. बाहेर वातावरणामध्ये उकाडा असला तरी उंचावर वारा वाहत असल्याने उकाडा जाणवत नव्हता. साधारणपणे चार मजली इमारतीच्या उंचीवरून प्रवास करत चेंबूरला जाण्याची सर्वांनाच ओढ लागली होती. अखेर गाडीने शिट्टी नव्हे हॉर्न वाजवला आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात देशातील पहिल्या ‘मोनोरेल’चा वडाळ्याहून चेंबूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला..
अवघ्या १६ मिनिटांमध्ये वळणावळणाने आजूबाजूच्या राष्ट्रीय रासायनिक आणि खत प्राधिकरण, भारत पेट्रोलियमचा गॅस भरण्याचा प्रकल्प, माहुलगाव आणि लवकरच मुंबईच्या वाहतुकीचा कणा बनणारा मुक्त पूर्व महामार्ग पाहात वडाळा ते चेंबूरचा प्रवास पार झालाच पण आजूबाजूच्या इमारतींमधून आणि खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या चेंबूरकरांच्या आश्चर्याच्या नजरा आणि उंचावलेल्या हातांना प्रतिसाद देत हा प्रवास कधी पूर्ण झाला हेही कळले नाही.
वडाळा येथे प्रतीक्षा नगरच्या मागील बाजूस असलेल्या मोनो रेलच्या डेपोमधून गुलाबी रंगाची चार डब्यांची गाडी वडाळा डेपो मोनो रेल्वे स्थानकामध्ये उभी राहिली आणि एका नव्या वाहतूक पर्वाला आरंभ झाल्याची जाणीव सर्वांनाच झाली.
अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यातून प्रवास नेमका कसा होणार आहे आणि कोणता अनुभव मिळणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. एका डब्यामध्ये १२० प्रवासी क्षमता असलेल्या चार डब्यांच्या या गाडीमध्ये छायाचित्रकार आणि पत्रकार यांच्यासमवेत ‘एमएमआरडीए’चे आयुक्त राहुल अस्थाना, सहआयुक्त आश्विनी भिडे, राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया आदी मान्यवरही या प्रवासात सहभागी झाले होते.
वडाळा डेपो, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर टाऊनशीप, व्हीएनपी-आरसी मार्ग जंक्शन आणि चेंबूर अशी या मार्गावर असलेली स्थानके अद्याप पूर्ण तयार नसली तरी किरकोळ कामेच राहिली असल्याचे दिसत होते. गाडी सुरू झाली तशी सर्वांच्या मनातल्या भीतीयुक्त उत्सुकता पराकोटीला पोहोचली होती. एका हाताने गाडीतील हॅण्डल पकडून किंवा बाजूचा स्टील बार पकडून प्रत्येकजण आजूबाजूला जणू एखादे नवे शहर पाहावे तसा नेहमीचाच परिसर पाहत होते.
सगळा परिसर वेगळाच दिसत होता. वाढती वस्ती आणि गर्दी वेगळी भासत होती. गाडी वळण घेत असताना एसेल वर्ल्डमधल्या रोलर कोस्टरची तर सरळ जात असताना बसणारे हादरे रस्त्यावरील एसटीच्या प्रवासाची आठवण करून देत होती.
सगळ्यांच्या नजरा दोन्ही बाजून दिसणारा वडाळा ते चेंबूरचा परिसर न्याहाळत होत्या. आजूबाजूच्या शाळांमधून आणि इमारतींच्या गच्चीमधून अनेकजण हात हलवत उभे होते. एका ठिकाणी तर रस्त्यावरील लोकही काही क्षण थांबून गाडीचा हा प्रवास पाहत होते.
वडाळा ते चेंबूर हा आठ किमीचा प्रवास त्याच मार्गाने रस्त्यावरून जाताना किमान एक ते दीड तास लागत होता आता हाच प्रवास अवघ्या १६ मिनिटांत होणार हीच नव्या वाहतुकीच्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
किमान भाडे आठ रुपये
सुमारे २० किमी वेगाने जाणाऱ्या या गाडीतून एकावेळी ४८० प्रवासी प्रवास करू शकतात. आठ ते २० रुपये इतके संभाव्य भाडे असणाऱ्या मोनो रेलचा पहिला टप्पा (वडाळा ते चेंबूर) ऑगस्ट २०१३ पर्यंत पूर्ण होणार असून ऑगस्ट २०१४ मध्ये संपूर्ण रेल्वे मार्ग (चेंबूर ते जेकब सर्कल) प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती आयुक्त राहुल अस्थाना यांनी दिली.
या गाडीचा वेग किमान २० तर कमाल ३२ किमी प्रति तास इतका असेल. या गाडीला ट्राम वे कायदा लागू असेल आणि निवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या गाडीच्या प्रवासाला सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोनो आरंभ
मोनोरेलने शनिवारी राष्ट्रीय रासायनिक आणि खत प्राधिकरण, भारत पेट्रोलियमचा गॅस प्रकल्प, माहुलगाव आणि लवकरच मुंबईच्या वाहतुकीचा कणा बनणारा मुक्त पूर्व महामार्ग पाहात वडाळा ते चेंबूरचा प्रवास पूर्ण केला. आणि मुंबईत मोनोरेल पर्वाची नांदी झाली.
वैशिष्टय़े काय?
चार डब्यांच्या या गुलाबी राणीद्वारे दीड तासांचा प्रवास अवघ्या सोळा मिनिटात होणार. गाडीचा वेग ताशी २० ते ३२ किमी आहे. त्यात एकावेळी ४८० प्रवासी बसू शकतात.
कोणती कामे शिल्लक?
वडाळा डेपो, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर टाऊनशीप, व्हीएनपी-आरसी मार्ग जंक्शन आणि चेंबूर अशी या मार्गावर असलेली स्थानके अद्याप पूर्ण तयार नसली तरी त्यांची किरकोळ कामेच राहिली आहेत.
फायदा काय?
वडाळा ते चेंबूर हा आठ किमीचा प्रवास त्याच मार्गाने रस्त्यावरून जाताना किमान एक ते दीड तास लागत होता आता हाच प्रवास काही मिनिटांच्या टप्प्यात आलाआहे. ही नव्या वाहतुकीच्या पर्वाची नांदी ठरणार आहे.
वडाळा ते चेंबूर मेनोरेल प्रवासाची ‘हवा-हवाई’!
* दीड तासांचा प्रवास अवघ्या १६ मिनिटांत * गाडीची क्षमता ४८० प्रवासी वाहून नेण्याची * गुलाबी रंगांची चार डब्यांची गाडी * याच वर्षी ऑगस्टपासून प्रवाशांना लाभ घेता येणार दुपारी साधारण दीडचा सुमार. बाहेर वातावरणामध्ये उकाडा असला तरी उंचावर वारा वाहत असल्याने उकाडा जाणवत नव्हता.
First published on: 17-02-2013 at 03:06 IST
TOPICSमोनोरेल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wadala to chembur monorail test drive