लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सात वाघाटीच्या पिल्लांचा फेब्रुवारीच्या अखेरीस मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यापैकी सहा पिल्लांचा मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे, तर, एका पिल्लाचा मृत्यू उंचावरून खाली पडल्यामुळे झाला.
वाघाटी हा मांजर कुळातील प्राणी आहे. वाघाटी हुबेहूब बिबट्यासारखी दिसते, मात्र आकाराने लहान असते. वाघाटीचा रंग व अंगावरील ठिपके बिबट्याप्रमाणेच असतात. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वाघाटी प्रजनन प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय उद्यानात दुर्मीळ होत असलेल्या वाघाटीच्या वाढीसाठी २०१३ पासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील एका गावातील शेतात फेब्रुवारीमध्ये ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांना वाघाटीची तीन पिल्ले आढळली. प्रथमदर्शनी ती मांजरीची पिल्ले असल्याचे समजून ऊसतोड कामगारांनी त्यांना घरी नेले. मात्र ही बाब लक्षात येताच वनविभागाने वाघाटीची पिल्ले ताब्यात घेतली आणि ती जेथे सापडली तेथे ठेवली. पिल्लांची व आईची भेट घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांची आई तेथे न आल्याने अखेर ती पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे सुपूर्द करण्यात आली.
कोल्हापूर येथून आणलेली ही तीन पिल्ले अगदी काही दिवसांची होती. पिल्लांना राष्ट्रीय उद्यानात आणले तेव्हाच ती अशक्त आणि आजारी होती. त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. पहिले दोन महिने त्यांना आईच्या दुधाची गरज असते, मात्र पिल्ले आईपासून दुरावल्यामुळे ते शक्य झाले नाही. आईपासून दुरावल्यामुळे आणि आवश्यक पोषणमूल्ये न मिळाल्याने या पिल्लांना संसर्गजन्य आजाराने ग्रासले आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोल्हापूरमधून उद्यानात आणलेली, पूर्वीची वाघाटीची १ जोडी, तसेच पुणे येथून काही वर्षांपूर्वी आणलेली अशी एकूण ११ पिल्ले राष्ट्रीय उद्यानात होती. यापैकी सहा पिल्लांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला. तर, एकाचा मृत्यू हा उंचावरून पडून झाला. प्रजनन केंद्रातील वाघाटीची एक जोडी वगळता इतर लहान होते.
प्रजननकाळ दोन-अडीच वर्षांनी
वाघाटी दोन ते अडीच वर्षांची झाली की प्रजनन करू शकते. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाटीची एक जोडी आहे. मात्र ती दीड वर्षांची आहे. यांचा प्रजनन कालावधी हा ६५ दिवसांचा असतो.
१५ प्रजाती भारतात आढळतात
मांजर कुळातील प्राण्यांच्या एकूण १५ प्रजाती भारतात आढळतात. भारतातील एकूण मांजर कुळातील प्रजातींपैकी दहा लहान प्रजाती आहेत. वाघाटी मुख्यत: उंदीर, घुशी अशा कृंतक वंशीय प्राण्यांची शिकार करतात. त्यामुळे पर्यावरण आणि अन्नसाखळीत ते महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतातील रान मांजरीनंतर सर्वात सामान्य आणि व्यापक प्रजाती म्हणून वाघाटी ओळखली जाते.
पश्चिम घाटात वास्तव्य
पश्चिम घाटातील काही भागात मर्यादित प्रमाणात हा प्राणी सापडतो. वाघाटीचा मानवी वस्ती जवळील जंगलात वावर असतो. आकार लहान असला तरी अत्यंत चपळ आणि अंधारात शिकार करण्यात तरबेज असलेला हा प्राणी आहे. वाघाटीच्या कपाळावर चार उभ्या रेषा असतात. मानेखालची बाजू पांढरी असते. तसेच डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे असतात. पाठीवर करड्या रंगाचे ठिपके असतात. वाघाटीचे वजन सुमारे एक ते दीड किलो असते. निशाचर आणि लाजाळू असल्याने वाघाटी सहज दृष्टीस पडत नाही.