गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गजबज सुरू होत असतानाच रविवारी कोकण रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली. महाडजवळील करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे आठ डबे रुळांवरून घसरल्याने सकाळी साडेसहा वाजल्यापासून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वीर आणि करंजाडी या स्थानकांदरम्यान मालगाडीचे आठ डबे घसरले. घटनास्थळी रेल्वेचे अखंड रूळ काही ठिकाणी तुटल्याचे दिसून आले असून सात डबे एका ठिकाणी तर काही अंतरावर आठवा डबा रुळावरून घसरलेला आढळून आला. या घटनेनंतर या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. दादर पॅसेंजर रत्नागिरीतील भोके स्थानकात थांबवण्यात आली. तर मंगला एक्स्प्रेस, कोईमतूर-बिकानेर, केरळा संपर्क क्रांती, नेत्रावती, जनशताब्दी अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा वेगवेगळ्या स्थानकांत रोखण्यात आल्या.
प्रवाशांच्या मदतीला एसटी बस
रेल्वेगाडय़ांत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध करून दिल्या. महाड येथे वीर स्थानकात अडकून पडलेल्या ८८९ प्रवाशांना १९ बसेसच्या मदतीने खेड येथे पाठवण्यात आले. ८६ प्रवाशांना बसेसमधून चिपळूण येथे पाठवण्यात आले. पेण येथे अडकून पडलेल्या संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला.
गणेशोत्सवापूर्वीच कोकण रेल्वेवर ‘विघ्न’
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गजबज सुरू होत असतानाच रविवारी कोकण रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली
First published on: 25-08-2014 at 03:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wagons of konkan railway train derail