कुलदीप घायवट
धोबी घाटावर सर्व धोबी बांधव खडकावर जोरजोरात कपडे आपटून, कपड्यांवर धोपाटणे मारतात. धोबी पक्षी त्याची शेपटी सतत आपटत असतो. त्यामुळेच या पक्ष्याला मराठीमध्ये ‘धोबी’, ‘परीट’ असे म्हटले जाते. इंग्रजीत ‘वॅगटेल’ म्हणून हा पक्षी ओळखला जातो. युरोप आणि आशिया खंडातील सौम्य वातावरणातून हे पक्षी स्थलांतरित होतात. त्यांचे मूळ वास्तव्य पश्चिम युरोपात आहे. या पक्ष्याचा समावेश ‘मोटॅसिल्लीडी’ या पक्षिकुलात होतो.
देशभरात धोबी पक्षी सर्वत्र आढळून येत असून तो येथील स्थानिक पक्षी आहे. तर, धोबी पक्ष्याच्या इतर उपजाती या हिवाळ्यात पाहूणे म्हणून पाणथळ जागी येतात. धोब्याचे शास्त्रीय नाव ‘मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस’ असे आहे.
धोबी पक्षी हा साधारणपणे बुलबुलाएवढा असतो. त्यांची लांबी ८ ते ९ इंच असते. या पक्ष्याच्या चोचीपासून डोळ्यावरून मानेपर्यंत पांढरा पट्टा असतो. चोच अगदी टोकदार आणि काळीशार असते. डोळे तपकिरी असतात. धोबी पक्ष्याचे डोके, मान, छातीचा वरचा भाग आणि पाठ काळ्या रंगाची असते. बुलबुलपेक्षा शेपटी मोठी असून शेपटीची मधली पिसे काळी व दोन्ही कडांची पिसे पांढरी असतात.
हेही वाचा >>> मुंबई–जीवी : काटय़ांचा पिसारा असलेले साळिंदर
पिवळा धोबी हा आकाराने चिमणीएवढाच असतो. कपाळ पिवळे, भुवया पिवळसर-पांढरट रंगाच्या असतात. वरील भागाचा रंग हिरवट पिवळा असून शेपटीची किनार पांढरी असते. खालील भागाचा रंग पिवळा असतो. उन्हाळ्याच्या आरंभी नराचे सगळे डोके चकचकीत पिवळे असतात. निळ्या डोक्याचा धोबीचे डोके निळसर राखी रंगाचे असते. त्याची भुवई ठळक पांढरी रंगाची असते.
हेही वाचा >>> मुंबई-जीवी : नाचणारा नाचण पक्षी
धोबी पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागेवर आढळतात. नदी, ओढे, दलदल, तलाव, नाले, डबके, खाडीकिनारी दिसतो. यांसह माळराने, खेळांची मैदाने, उद्याने, बागांच्या परिसरात तो दिसतो. फारसा माणसांना न घाबरणाऱ्या या पक्ष्याचा मनुष्यवस्तीत वावर असतो. धोबी पक्षी नदी पात्रातल्या खडकाच्या कपारीत, झुडपांमध्ये गवत, वनस्पतींची मुळे, तंतू, चिंध्या, दोरे, सुकलेले गवत, बारीक काटक्या, पिसे यांच्या साहाय्याने लहान आणि साधे वाटीसारखे घरटे बांधतात. त्यात लोकर, पिसे, केसांपासून मऊ गादी तयार करतात. पांढरी आणि त्यावर करड्या, तपकिरी, हिरव्या रंगाचे ठिपके असतात. अंडी घातल्यावर नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे व पिल्ल्यांना वाढवण्याचे काम करतात. पिल्ले दोन आठवड्यानंतर पूर्ण वाढ होऊन स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होतात. हा पक्षी कीटकभक्षी असून जोडीने जमिनीवर येऊन, किडे, नाकतोडे, टोळ, चतुर यांना खातो. जमिनीवर तुरू तुरू चालून शेपटी वरखाली हालवून कीटक खातात. तसेच काही वेळा हवेत उडणारे कीटकही पकडतात. उंच तारेवर, छतावर बसून आराम करतात. धोबी पक्ष्याचा आवाज भारदस्त, पण मधूर असतो.