दक्षता पथकाकडून धडक कारवाई करत प्रकरण आणले उघडकीस

मुंबई : रेल्वेगाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी प्रवासी खूप दिवस आधी तिकिटे काढतात. मात्र, त्यांना तरीही आरक्षित तिकीट मिळत नाही. ३०० ते ४०० प्रतीक्षा यादी असलेल्या रेल्वेगाड्यांची तिकिटे काढून, तिकीट आरक्षित होण्याची वाट पाहतो. परंतु, रेल्वेची तिकीटे आरक्षित होत नाही. त्यामुळे त्याला पर्यायी मार्ग निवडून प्रवास करावा लागतो.

मात्र, मुंबईतील एका उपाहारगृहातील (कॅन्टीन)मधील वेटर रेल्वेगाड्यांची आरक्षित तिकिटे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उच्च रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्याचा वापर करून तो प्रवाशांना उच्च अधिकाऱ्यांच्या कोट्यातून तिकीटे आरक्षित करून देत होता. दक्षता पथकाने केलेल्या धडक कारवाई हे प्रकरण उघडकीस आले आहे.

तिकीट दलालांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून, उच्च अधिकारी कोट्यावर तिकिटे आरक्षित केल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. गाडी क्रमांक १२३२२ सीएसएमटी ते हावडा कोलकाता मेल या रेल्वेगाडीमधील उच्च अधिकारी कोट्याचा वापर करून, तिकिटे आरक्षित केल्याचे समजले. या मिळालेल्या माहितीच्या आधारे दक्षता पथक गुरुवारी रात्रीच्या सुमारास या रेल्वेगाडीत कल्याणहून चढले. त्यानंतर त्यांनी अचानक तपासणी करण्यात सुरुवात केली. तपासणी करतेवेळी पथक एस २ शयनयान डब्यात प्रवेश केला.

आरक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या आणि उच्च अधिकारी कोट्यातून आसन क्रमांक १८, २१, २२, २५, २६ आणि २७ या सहा संशयित प्रवाशांची तपासणी केली. तपासणी दरम्यान असे आढळून आले की, सहा प्रवाशांपैकी एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर प्रवास करत होता. या प्रवाशाकडून त्यानुसार शुल्क आकारण्यात आले. तर इतर पाच प्रवाशांना वैध ओळखपत्र पुराव्यासह प्रवास करताना आढळून आले आणि त्यांची ओळखपत्रे तिकिटांशी जुळली.

तपासणी दरम्यान असे उघड झाले की, त्यांनी सीएसएमटी स्थानकावरील एका व्यक्तीला जास्त पैसे दिले होते. ज्याने त्यांना पुष्टीकृत आरक्षण तिकिटे दिली. प्रवाशांचे जबाब घेऊन प्रवाशांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे दक्षता पथकाने त्यांना उच्च अधिकारी कोट्याद्वारे आरक्षित तिकिटे देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीची माहिती काढली असता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वाहतूक लेखा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गार्ड कॅन्टीनमध्ये तो काम करत असल्याचे समोर आले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव रवींद्र कुमार साहू आहे. तपासणी दरम्यान त्याच्याकडे वेगवेगळ्या विभागांच्या चार वेगवेगळ्या रेल्वे अधिकाऱ्यांचे शिक्के आढळले.

महिन्याला १ ते १.५ लाखांची कमाई

अटक आरोपी हा तिकिटे आरक्षित करण्याच्या अर्जावर पीएनआरची माहिती भरत असे आणि अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का मारून बनावट स्वाक्षरी करत असे. शिक्का आणि स्वाक्षरी केलेले अर्ज विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयातील आणीबाणी कोटा सेलच्या वाटपासाठी ठेवलेल्या रकान्यात टाकत असे. तसेच रेल्वे तिकिटांचा व्यवसाय करत, प्रवाशांना उच्च अधिकारी कोट्याद्वारे आरक्षित तिकिटे देत असल्याचे आरोपीने मान्य केले आहे. तसेच त्याच्या बॅंकमधील आर्थिक व्यवहाराची पाहणी केली असता, एका महिन्यात १ ते १.५ लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार आढळून आले. तपासणी आणि आरोपीकडून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे, रेल्वे कायद्यानुसार आवश्यक कारवाईसाठी त्याला आरपीएफ, सीएसएमटीकडे सोपावण्यात आले आहे.

दक्षता पथकाने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याला आरपीएफच्या हवाली केले आहे. प्रवाशांनी आरक्षित तिकिटांच्या आमिषाला बळी पडू नये. जर कुठल्याही प्रवाशाला तिकीट दलालांची माहिती मिळाली तर त्यांनी ही माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी. त्यामुळे अशा अपप्रवृत्तींना आळा बसेल. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे