लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ४’, ‘कासारवडवली झ्र गायमुख मेट्रो ४ अ’, ‘गायमुख झ्र शिवाजी चौक (मीरारोड)’ आणि ‘वडाळा झ्र सीएसएमटी मेट्रो ११’ मार्गिकांसाठी ठाण्यात एकात्मिक कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र यासाठी आवश्यक असलेली ठाण्यामधील मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा अद्यापही एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. जागेचा ताबा मिळत नसल्याने कारशेडच्या कामास विलंब होत असल्याने एमएमआरडीएची चिंता वाढली आहे.

एमएमआरडीएने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र या मार्गिकांसाठी आवश्यक असलेल्या कारशेडच्या कामाला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. एमएमआरडीएने या मार्गिकांची कारशेड मोघरपाडा येथे प्रस्तावित केली होती. मात्र ही जागा कारशेडसाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केल्याने कारशेड रखडली आणि त्यावरून मोठा वादही झाला. मात्र शेवटी हा वाद मिटविण्यात एमएमआरडीएला यश आले. शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तयारी दाखवली. त्यानुसार राज्य सरकारने ऑक्टोबर २०२३ मध्ये मोघरपाड्याची जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध केला आहे.

आणखी वाचा-Mumbai Rain Alert: पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

१६७ शेतकऱ्यांना त्यांच्या भूखंडाच्या २२ टक्के विकसित भूखंड मोबदला म्हणून, तर अतिक्रमित जागेवरील ३१ शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण भूखंडाच्या १२ टक्के विकसित भूखंड मोबदला देण्यात येईल.

जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

जागा हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला, पण प्रत्यक्षात मात्र ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही, अशी माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम वेगात सुरू असताना आणि शक्य तितक्या लवकर ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट असताना जागा ताब्यात न आल्याने एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. या जागेचा ताबा मिळावा यासाठी एमएमआरडीए ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. याविषयी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting for land in mogharpada for integrated car shed in thane mumbai print news mrj