लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : सीएसएमटी आणि मशीद बंदर या दोन स्थानकांदरम्यान असलेल्या सुमारे दीडशे वर्षे जुन्या कर्नाक पुलाचे काम आधीच रखडलेले असताना आता या पुलाची तुळई बसवण्यासाठी रेल्वेच्या मेगाब्लॉकची प्रतीक्षा आहे. जोडकाम करून या पुलाची एका तुळई तयार आहे. मात्र पावसाळ्यात रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळत नसल्यामुळे तुळई बसवण्याच्या कामाला वेळ लागणार आहे. दोन्ही तुळई बसवून हा पूल वाहतुकीसाठी थेट पुढच्या वर्षाअखेरीस खुला होऊ शकणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मशीद बंदर स्थानक आणि सीएसएमटी या दोन स्थानकांदरम्यान असलेला कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर हा पूल नोव्हेंबर २०२२ मध्ये पाडण्यात आला. या पुलाच्या बांधकामाला २०२३ मध्ये सुरूवात करण्यात आली. पुलाच्या तुळईचे सुटे भाग गेल्या महिन्यात मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर या तुळईची जोडणी पूर्ण झाली असून रेल्वेमार्गाच्या पूर्व दिशेला तुळई बांधून तयार आहे. ही तुळई रेल्वे मार्गांवर बसवण्यासाठी पालिका प्रशासनाने रेल्वेकडे मेगाब्लॉकची मागणी केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप पालिका प्रशासनाला ब्लॉक दिलेला नाही.
आणखी वाचा-आयर्लंड वकिलातीमधील अधिकाऱ्याची सायबर फसवणूक, आरोपीला हरियाणातून अटक
पालिका प्रशासनाने सहा तासाच्या ब्लॉकची मागणी केली असून दिवसा हा ब्लॉक देण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र पावसाळ्यात या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक दिला जात नाही. त्यामुळे पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार असून तुळई बसवण्याचे काम ऑक्टोबरमध्येच होण्याची शक्यता आहे. या पुलाच्या कामासाठी ५३ कोटी खर्च करण्यात येत असून पाच वर्षांपूर्वीच या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अनेक अडथळ्यांमुळे काम उशीरा सुरू झाले. त्यामुळे या परिसरात नागरिकांना वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे पूर्व – पश्चिम जोडणाऱ्या या पुलासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
पूर्ण अधांतरी तुळई
तुळई बसवण्यासाठी रेल्वे रुळांलगत खांब पूर्णत: अधांतरी (कॅण्टीलिवर) हा पूल पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकवण्यात येईल. हे काम अत्यंत जोखमीचे असल्यामुळे पावसाळ्यानंतरच हा ब्लॉक मिळेल. ७० मीटर लांब आणि ९.५ मीटर रुंद अशा या तुळईचे वजन सुमारे ५५० मेट्रीक टन आहे. त्यानंतर दुसरी तुळई जोडली जाईल. दुसरी तुळई बसवण्याचे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.