२० ठिकाणी लवकरच रोपण : पालिकेचा दावा

प्रसाद रावकर
मुंबई : ‘सुंदर मुंबई, हरित मुंबई’चे स्वप्न उरी बाळगून ‘मियावाकी’ पद्धतीची जंगले निर्माण करण्याचा संकल्प सोडणाऱ्या महापालिकेला गेल्या सुमारे दीड वर्षांमध्ये चार लाखांपैकी अडीच लाख रोपांची लागवड करता आली आहे. उर्वरित दीड लाख रोपांना लागवडीची प्रतीक्षा आहे. लागवडीच्या प्रतीक्षेत असलेल्या रोपांसाठी २० ठिकाणे हेरण्यात आली असून तेथे त्यांचे रोपण करण्यात येणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमध्ये सध्या निरनिराळी विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची कत्तल वा अन्यत्र पुनरेपण करण्यात येत आहे. पुनरेपण केलेल्या वृक्षांचे पुढे काय होते हा प्रश्न अनुत्तरित आहे. एकूण विकासकामे, इमारतींचा पुनर्विकास आदी विविध प्रकल्पांमुळे वृक्षसंपदेवर गदा येत आहे. परिणामी, मुंबईला पडलेला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे.

मुंबईतील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पालिकेने ‘मियावाकी’ पद्धतीने ठिकठिकाणी छोटेखानी जंगल निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. ‘मियावाकी’ जंगलांसाठी ६० ठिकाणे निश्चित करण्यात आली. या ठिकाणी तब्बल चार लाख रोपांची लागवड करण्याचा संकल्प त्यावेळी सोडण्यात आला होता. पालिकेने २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ४० ठिकाणी चारपैकी दोन लाख ५० हजार रोपांची लागवड केली. उर्वरित २० ठिकाणी सुमारे एक लाख ५० हजार रोपांची लागवड होऊ शकलेली नाही. टप्प्याटप्प्याने ती करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदा पावसाळा सुरू होता होता ५ जून रोजी मुंबईत आणखी २५ हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प पालिकेने सोडला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पपूर्तीसाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले.

आतापर्यंत त्यापैकी १२ हजार झाडांची ठिकठिकाणी लागवड करण्यात आली असून उर्वरित १३ हजार झाडांची पावसाळा संपण्यापूर्वी लावण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पाच कोटी खर्च

मुंबईत ‘मियावाकी’ पद्धतीतील उद्याने निर्माण करण्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी केवळ चार ते पाच कोटी रुपये खर्च झाले असून त्यात दोन लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. सध्या कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून मियावाक उद्याने निर्माण करण्याकडे पालिकेचा कल आहे. काही बडय़ा कंपन्या, विकासक, सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मंजूर निधीपैकी सुमारे ३० ते ४० टक्के रकमेची बचत होऊ शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मुंबईत जागेचा प्रश्न भेडसावतो. त्यामुळे कमी जागेत अधिक रोपांची लागवड करून मियावाकी उद्याने निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्यानात देशी प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाते. त्यामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मदत होईल. नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

– जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक