मुंबई : मोसमी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज फोल ठरला. यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने दडी मारली असून मुंबईत पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, सोमवारपासून मुंबईत मोसमी पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु, सोमवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांना पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारांचा सामना करावा लागला.
मुंबई आणि उपनगरांत काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने हा संपूर्ण आठवडा मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परंतु, सोमवारी मुंबईत संपूर्ण दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. पावसाने विश्रांती घेतल्याने ऐन पावसाळ्यात कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.
हेही वाचा – वस्तू सेवा कर परिषदेच्या बैठकीला अजित पवारांची दांडी; शरद पवार गटाची टीका
दरम्यान, मुंबईसह राज्यातील काही भागांत पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, पुणे, नाशिक, कोल्हापूर भागात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
© The Indian Express (P) Ltd