लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : निवडणुकीला रातोरात स्थगिती, राजकीय आरोप – प्रत्यारोप आणि न्यायालयातील लढाई आदी विविध कारणांमुळे मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक सुरुवातीपासूनच रखडली आहे. या पार्श्वभूमीवर एका महिन्यानंतरही नोंदणीकृत पदवीधरांची सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सुधारित मतदारयादी अद्यापही जाहीर न झाल्यामुळे अधिसभा निवडणूक पुन्हा लांबणीवर पडून ती लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने २९ फेब्रुवारी रोजी नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदारयादी व अपात्र ठरलेल्या अर्जांची कारणासहित यादी जाहीर केली होती. एकूण २६ हजार ९४४ नोंदणीपैकी ५० टक्के पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते. तात्पुरत्या मतदारयादीनुसार १३ हजार ३९४ पदवीधरांचे मतदार पात्र, तर विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १३ हजार ५५० पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र ठरले. त्यानंतर अपात्र अर्ज ठरलेल्या पदवीधरांना ४ मार्चपर्यंत काही वगळलेल्या किंवा चुकीच्या नोंदी निदर्शनास आणून देण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर जवळपास महिना होत आला तरीही पदवीधर व विद्यार्थी संघटना सुधारित मतदार यादीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, तात्पुरत्या मतदार यादीतील ६८६ जणांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.

आणखी वाचा-मालमत्ता करवसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे केवळ तीन दिवस शिल्लक, करवसुलीत २१०० कोटींची तूट

मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एकूण १० जागांसाठी रविवार, २१ एप्रिल रोजी मतदान, तर बुधवार, २४ एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र तात्पुरती मतदार यादीही उशीरा जाहीर झाली आणि आता एक महिना होऊनही सुधारित मतदार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही आता लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची दाट शक्यता आहे. ‘मुंबई विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही लोकसभा निवडणुकीनंतरच घेण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. उच्च न्यायालयात सादर केलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकाचे विद्यापीठ प्रशासन पालन करीत नाही आहे’, असे मत ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले.

तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘संभाव्य वेळापत्रकात नमूद केल्यानुसार निवडणूक २१ एप्रिल रोजी होणार नाही. नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीबाबतीत मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा वेळकाढूपणा सुरु आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरुवातीपासूनच सुरळीत झाली नाही. विद्यापीठ प्रशासन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करते, परंतु त्याचे पालन करीत नाही. यावरून विद्यापीठाला ही निवडणूक घेण्यात रस नाही, हे स्पष्ट होते. पण ही निवडणूक होणारच आहे आणि त्यानंतर जेव्हा अधिसभेची बैठक होईल, तेव्हा विद्यापीठ प्रशासनाला या मनमानी कारभाराची उत्तरे द्यावी लागतील.

आणखी वाचा-आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : प्रदूषण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावे

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीसाठीची सुधारित मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात येईल. तसेच सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर निवडणूक घेण्यात येईल. -डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई विद्यापीठ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting for the revised voter list possibility of adhisabha election only after lok sabha mumbai print news mrj