मुंबई : गेल्या चार वर्षांपासून वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज याच परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमधील काही खोल्यांमध्ये सुरू आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारतीमधून काम करताना वडाळा पोलिसांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने वडाळा पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधावी आणि कार्यालय तेथे स्थलांतरित करावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुंबई फोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) भूखंडावर बांधलेल्या इमारतीत १९६८ मध्ये वडाळा पोलीस ठाणे सुरू करण्यात आले होते. मात्र काही वर्षापूर्वी या इमारतीची दुरवस्था झाली. भूखंड आणि इमारत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्याने त्यांच्या परवानगी शिवाय पोलिसांना इमारतीमध्ये डागडुजी करता येत नव्हती. पावसाळ्यात या इमारतीती पाण्याची गळती होत होती. तसेच अधूनमधून स्लॅबचा काही भाग कोसळत होता. यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर वडाळा पोलीस ठाण्याचे कार्यालय २०१९ मध्ये याच परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका इमारतीमध्ये हलवण्यात आले.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचे काम म्हणजे ‘वर्क फ्रॉम जेल’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

गेल्या चार वर्षांपासून वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इमारत क्रमांक ३२ मधील १६ खोल्यांमध्ये वडाळा पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू आहे. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आणि कामाचा वाढता व्याप यामुळे ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे जुन्या पोलीस ठाण्याची इमारत जमीनदोस्त करून तेथे सुसज्ज असे पोलीस ठाणे बांधावे, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. याबाबत वडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र चार वर्षांत पोलीस ठाण्याचा साधा आराखडाही तयार करण्यात आलेला नाही. नवीन सरकारने याची दखल घेऊन, पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

जुनी इमारत बनली खंडर

चार वर्षांपूर्वी जुन्या इमारतीमधून पोलीस ठाणे स्थलांतरित झाले असून आता ही इमारत खंडर बनली आहे. परिणामी, आता तेथे गर्दुल्यांचा वावर वाढू लागला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी ही इमारत जमीनदोस्त करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.