मुंबईतील जीवन-मरणाच्या अनेक समस्यांइतकी गंभीर वाटावी अशी शहरातील मोकळ्या भूखंडांची अवस्था झाली आहे. पालिकेच्या नव्या चटईक्षेत्राच्या नियमांमुळे तर मोकळ्या भूखंडांना ग्रहण लागते की काय अशीच काहीशी परिस्थिती आहे. असे चित्र असताना चेंबूरसारख्या उपनगरात मात्र मैदाने, हिरवी उद्याने व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे बघायला मिळतात. स्थानकाच्या पूर्वेकडील बहुतांश भागांत जिमखाना, मैदान, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सांडू उद्यान आणि डायमंड उद्यान ही तीन मोठी उद्याने आणि झाडांनी आच्छादलेला सुखावणारा परिसर पाहायला मिळतो. स्थानक परिसरात नसली तरी पूर्वेला स्थानकापासून पाच मिनिटांच्या आत ठरावीक उपाहारगृह भूक भागवण्यासाठी कामी येतात.
सद्गुरूची पावभाजी
स्थानकातून बाहेर पडून पुढे गेल्यास वैशाली गार्डन रेस्टॉरंट, सद्गुरू हॉटेल, वाइल्ड ऑर्चिड ही केंद्रे भूक भागवण्यास सक्षम असून डायमंड उद्यानाजवळ फासोस, रिबन्स अॅण्ड बलुन्ससारखे चांगले पर्यायदेखील उपलब्ध आहेत. सद्गुरू हॉटेलची पावभाजी अवघ्या चेंबूरमध्ये प्रसिद्ध आहे. शिवाय येथे वेगवेगळय़ा प्रकारचे ज्यूसही उपलब्ध आहेत.
युनियन पार्क
डायमंड उद्यानावरून वि. ना. पुरव मार्ग ओलांडून पुढे गेल्यावर ‘द बॉम्बे प्रेसिडेंसी गोल्फ क्लब’ हे अत्यंत जुने ‘गोल्फकोर्स’ लागते. याला युनियन पार्क असेही म्हणतात. १९२७ साली बांधलेला या क्लबचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. बरेच पैसे वगैरे भरून येथे नोंदणी करता येत असल्याने एखाद्या नवख्याला हे अनुभवयाचे झाल्यास येथे फेरफटका मारण्यास हरकत नाही.
हरित चेंबूर
चेंबूर पूर्वेला बाहेर पडले की, अवघ्या दोनच मिनिटांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान लागते. गोलाकार पसरलेल्या या उद्यानात बाबासाहेबांचा मोठा पुतळा असून क्षणभर विसाव्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. येथून सरळ दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सावल्यातून सुखावून पुढे गेल्यावर लंब-गोलाकार पसरलेले डायमंड उद्यान लागते. येथे मुलांची खेळणी, जॉगिंगचे पथ, कारंजी असून हवाई दलाचे जीनॅट-एम के हे लढाऊ विमान प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. या दोन्ही उद्यानांमध्ये ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे बोधचिन्ह असलेल्या सिंहाच्या मूर्त्यां कायमस्वरूपी स्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच आंबेडकर उद्यानापासून काही अंतरावर साण्डू उद्यान लागते. या साण्डू उद्यानाच्या अलीकडेच गांधी मैदान असून येथे बहुतांश क्रीडा प्रकारांचा सराव स्थानिक करतात, तर व्यावसायिक व हौशी पातळीवर खेळणारे अनेक जण हे आपली पसंती चेंबूर जिमखाना व त्याच्या मैदानाला देतात.