मुंबई: होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात नियमित प्रवाशांच्या तुलनेत प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे नियोजन करण्यात आले आहे. होळीसाठी पश्चिम रेल्वेने २४ तास प्रत्येक घडामोडीवर नियंत्रण ठेवणारी ‘वाॅर रूम’ तयार केली आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या चेंगराचेंगरीची घटना घडली होती. तसेच यापूर्वी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे ऑक्टोबर २०२४ मध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती. त्या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेऊन कडक बंदोबस्त ठेवला. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष पोलीस ताफा, कर्मचारी वर्ग आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गर्दीविरहित होण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
पादचारी पूल, रस्ते, रेल्वे स्थानकांत गर्दी होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात विश्रांती घेण्याकरीता थांबा तयार करण्यात आला आहे. वांद्रे टर्मिनसजवळ विश्रांती कक्ष तयार करून, तेथे गर्दीचे नियोजन केले जाणार आहे.पश्चिम रेल्वे प्रशासनाने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी ‘वॉर रूम’ सुरू केली आहे. तेथे ८ तासांच्या तीन पाळ्यांमध्ये काम चालणार आहे. सर्व टर्मिनसचे २४ तास नियंत्रण कक्षाद्वारे पाहणी केली जाणार आहे.
फलाटांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी फलाटांवर पादचारी पूल, जिने, सरकते जिने आणि लिफ्ट याठिकाणी रेल्वे पोलीस आणि आरपीएफच्या मदतीने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व पाळ्यांमध्ये तिकीट खिडक्या, प्रवेशद्वारे, विश्रांती कक्ष यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले गेले आहेत, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
– प्रवाशांची गर्दी असलेल्या दोन गाड्या एकाच वेळी फलाटावर आणण्याचे टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नियोजित केलेल्या फलाटांवर गाडी उभी करण्यात यावी. ज्या गाड्या रद्द होणार आहेत, मार्गात बदल होणार आहे, थांब्यातील बदल यांबाबत वारंवार घोषणा केल्या जातील. तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी फलाटाच्या दोन्ही टोकाला एक कर्मचारी नेमला जाणार आहे. प्रवाशांना उन्हाचा दाह होऊ नये, यासाठी अतिरिक्त पंखे, प्रतीक्षा कक्षात योग्य वायुवीजन केले जाणार आहे.
– ज्या प्रवाशांचे आरक्षित तिकीट झाले आहे त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे.
– प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अतिरिक्त एटीव्हीएम यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे.