राज्य सरकारच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयका’च्या विरोधात लढण्यासाठी वारकरी सज्ज झाले असून येत्या ११ डिसेंबर रोजी आळंदी येथे राज्यस्तरीय वारकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. राज्य शासन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आणू पाहत असलेले विधेयक रद्द व्हावे यासाठी नागपूर येथे हजारो वारकरी मोर्चा काढणार आहेत.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात येऊ घातलेले हे विधेयक रद्द केले जावे या मागणीसाठी विविध हिंदू संघटना तसेच वारकरी संप्रदाय एकत्र आले असून या कायद्यातील अनेक कलमांमुळे हिंदू धर्माची पाळेमुळे उखडण्याचेच काम होणार असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवाजी व्हटकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. या कायद्यासंदर्भात वारकरी संप्रदाय तसेच विविध हिंदू संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांचा अभ्यास केला जाईल व अनावश्यक कलमे काढून टाकली जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गेल्या अधिवेशनकाळात दिले होते. त्याची आजपर्यत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असे सांगून व्हटकर म्हणले, बहुमताच्या जोरावर हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ज्या संघटना घोटाळ्यावर घोटाळे करत आहेत त्यांची सर्वप्रथम चौकशी झाली पाहिजे. या प्रस्तावित कायद्यातील काही कलमांमुळे हिंदूंची मोठय़ा प्रमाणात छळवणूक होऊ शकते. समाजात भोंदूगिरी करून फसविणाऱ्यांसाठी आयपीसी कायदा सक्षम असून त्याची कठोरपणे अंमलबजावणी न करता हिंदूच्या सर्वच धार्मिक चालीरीतींना छेद देणारा कायदा लादण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू संघटना व वारकरी संप्रदाय त्याला कडाडून विरोध करेल, असेही ते म्हणाले.   

Story img Loader