एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के पगारवाढ देण्यात यावी, कनिष्ठ वेतनश्रेणी पद्धत रद्द करण्यात यावी आणि प्रलंबित कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव आदिक यांनी दिला आहे.
एसटीच्या संचालक मंडळाने ठराव करून कामगार कराराला मान्यता दिली असूनही अद्याप या करारावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचप्रमाणे कनिष्ठ वेतनश्रेणीची मुदत पाच वर्षांंवरून तीन वर्षे करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असूनही अद्याप त्यावर शासनाने काहीही कार्यवाही केलेली नाही, असे सांगून शासन एसटी कामगारांचे सर्वच प्रश्न प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप गोविंदराव आदिक यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
कामगारांना ३० टक्के वेतनवाढ मिळालीच पाहिजे. तसेच कराराबाबत मध्यस्थी करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, असे आदिक यांनी पत्रकात म्हटले आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ९ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनाचा एक भाग म्हणून २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा