विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात मनसेचे आमदार राम कदम यांनी पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे मनसेची प्रतिमा कमालीची मलिन झाली. याची गंभीर दखल घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ‘अभ्यासोनी प्रकटावे’ असा सक्त आदेश दिला आहे. विधिमंडळ हे ‘खळ्ळ खटॅक’ची जागा नाही, असे बजावत मनसेचा आवाज विधायक प्रश्न मांडूनच उमटला पाहिजे, अशी भूमिका राज यांनी मांडली आहे.
सिंचनातील घोटाळे, राज्यातील दुष्काळ, एलबीटीचा प्रश्न, टोलवसुली आणि खराब रस्ते, दलितांवरील हल्ले, महिलांवरील अत्याचार, कायदा व सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण तसेच सार्वजनिक आरोग्याचा बाजार, वैद्यकीय शिक्षणाची दुरवस्था, राजीव गांधी जीवनदायी योजनेत नी रिप्लेसमेंटचा समावेश नसणे व अन्य गैरव्यवहार, वाढती महागाई, साथीचे आजार यासह विविध विषयांवर मनसेचे आमदार आवाज उठवतील, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळत नाहीत, तसेच महापालिकेने सेव्हन हिल्स रुग्णालयाला जमीन देताना २० टक्के रुग्णांना पालिकेच्या दराने उपचार देणे बंधनकारक केले असूनही असे उपचार  न मिळणे आदी विषयांवरही आवाज उठविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning to mns mlas by raj thakray