शीना वोरा हत्याप्रकरणाबाबत बुधवारी दिवसभरात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. शीना वोरा ही माझी बहिण नसून आपल्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी असल्याचा कबुली जबाब याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या इंद्राणी यांनी बुधवारी दिला. मात्र, या सगळयाबाबत आपण अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया स्टार इंडियाचे माजी सीईओ आणि इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांनी दिली आहे. शीना वोरा ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचे आजवर मला माहितच नव्हते, असे पीटर मुखर्जी यांचे म्हणणे आहे. इंद्राणीच्या या गौप्यस्फोटामुळे मला धक्का बसला. ती आपल्यापासून एवढी महत्त्वाची माहिती लपवून ठेवेल किंवा गुन्हा करेल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. तिच्या पूर्वाश्रमीच्या आयुष्यात संजीव खन्ना तिचा जोडीदार होता. एवढीच माहिती मला होती. शीना ही इंद्राणीची बहिण असल्याचेच मी इतके वर्ष समजत होतो. मात्र, शीना तिची बहिण नसून मुलगी असल्याचे मला आज समजले. तिने असे का केले याची काहीच कल्पना नाही. या धक्कादायक माहितीसोबतच अनेक नवे गौप्यस्फोट चौकशीदरम्यान सातत्याने समोर येत आहेत. हे सर्वकाही माझ्यासाठी माझ्यासाठी अनपेक्षित आहे. त्याबद्दल कोणतीही माहिती मला माहित नव्हती, असे पीटर मुखर्जी यांनी सांगितले. तसेच पुढील चौकशीसाठी आपण पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करेन, असेही  पीटर पुढे म्हणाले. इंद्राणीवर माझा संपूर्णपणे विश्वास होता. त्यामुळे मुलात आणि माझ्यात दरी देखील निर्माण झाली. गेल्या तीन वर्षांपासून मी आपल्या मुलाशी नीट बोललो देखील नाही, असेही पीटर यांनी सांगितले.
दरम्यान, शीना वोरा या महिलेच्या खुनाच्या प्रकरणात पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेल्या इंद्राणी यांची कसून चौकशी सुरू असून याप्रकरणाचा उकल होण्यास सुरूवात झाली आहे. इंद्राणी यांच्यासह त्यांच्या चालकालाही मंगळवारी अटक करण्यात आली. त्याच्याकडूनही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याशिवाय, इंद्राणी यांचा पहिला पती संजीव खन्ना यालाही कोलकात्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.