मुंबई : जुनी वृत्तपत्रे, वह्या-पुस्तके आदींच्या रद्दीचा भाव काही महिन्यांत वधारलेला आहे. भविष्यातही तो तसाच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येते. परदेशातून येणाऱ्या रद्दीचा पुरवठा बंद झाल्यामुळे देशी रद्दी मालाला उठाव आल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
करोनापूर्व काळात असलेल्या दराच्या दुप्पट म्हणजेच प्रत्येक किलोमागे २५ ते ३० रुपये इतका रद्दीचा दर आहे. तो प्रत्येक ठिकाणी एक ते दोन रुपये कमी-अधिक आहे.
गेल्या काही महिन्यांत अगदी पावसाळय़ातही रद्दीचा हा दर कायम राहिला. कच्चा मालाला असलेली मागणी व परदेशातून बंद झालेला कच्चा माल हे प्रमुख कारण सांगितले जाते. कागद उत्पादन गिरणीसाठी (पेपर मिल) लागणारी रद्दी अमेरिका तसेच युरोपमधून मोठय़ा प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध झाल्याने करोना काळात रद्दीचे भाव घसरले होते. सर्वाधिक रद्दी चीनमधून येत होती. मात्र करोनामुळे त्या देशांतर्गत कागद निर्मितीची मागणी वाढली. त्यामुळे चीनमधील रद्दी बाहेर पाठविण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतातील कारखानदार देशी रद्दीकडे वळले, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
भारतात वापरण्यात येणाऱ्या कागदापैकी केवळ २० टक्के कागदच पुन्हा रद्दीच्या रूपाने पुनप्र्रक्रियेसाठी पोहोचतो, असे ‘इंडियन पेपर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणात नमूद केले. याउलट विकसित देशात किमान ७५ टक्के कागद पुनप्र्रक्रियेसाठी संकलित केला जातो. परंतु त्यावर बंदी असल्याने अचानक भारतासारख्या देशांकडे परदेशी रद्दी मोठय़ा प्रमाणात आयात होऊ लागली. सध्या आयातीचा दर वाढल्याने पेपर मिल पुन्हा देशी रद्दीकडे वळले आहेत. परंतु त्यांनी भाववाढ केल्यामुळे हे कारखानदार हैराण झाले आहेत.
मुंबईत रोज एक हजार टन रद्दी..
मुंबईत रोज एक हजार टनाच्या आसपास रद्दी निर्माण होते. या देशी रद्दीला आता दिवसेंदिवस मागणी वाढत असल्यामुळे भाव वधारल्याचे रद्दी विक्रेता संघटनेचे म्हणणे आहे.