दादर- माटुंगा दरम्यान रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने तब्बल साडे तीन तास मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत होती. साडे तीन तास शेकडो विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन अडवून धरत मुंबईकरांना वेठीस धरले. या आंदोलनाची पूर्वकल्पना नसल्याने पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. या आंदोलनाचे नियोजन कसे झाले याची रंजक माहिती आता समोर आली आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ला या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची पूर्वतयारी कशी केली याची माहिती दिली. गेल्या अडीच महिन्यांपूर्वीच या आंदोलनाचा पाया रचला गेला. हे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेलं पहिलं आंदोलन नसून काही महिन्यांपूर्वी नवी दिल्लीतही आंदोलन करण्यात आलं होतं.

त्यावेळी नेहमीच्या सरकारी थाटात अहवाल बनवले गेले, मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं गेलं आणि परिस्थिती जैसे थे झाली. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींपैकी काहिंनी अत्यंत नीयोजनपूर्वक आंदोलन करण्याचे आणि ते ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्याचे ठरवले.
डिसेंबरमध्येच ठरवलं गेलं की आंदोलनाची तारीख २० मार्च असेल आणि ठिकाण मुंबईमधलं दादर माटुंगा परीसर. देशभरात जवळपास २५ हजार प्रशिक्षणार्थी आहेत. महाराष्ट्रमधून भरत परदेशी तर इतर राज्यांमधून इतर आयोजकांनी जमेल त्या मार्गाने या सगळ्यांचे फोन नंबर मिळवण्यास सुरुवात केली. ज्यांचे ज्यांचे नंबर मिळाले त्यांना या आंदोलनाची कल्पना दिली गेली.

आश्चर्याची बाब म्हणजे देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये विखुरलेल्या रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींना हे मेसेज पाठवले गेले आणि महाराष्ट्रासह बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश व कर्नाटक आदी अनेक राज्यांमधून काल १९ मार्चच्या रात्रीच शेकडो प्रशिक्षणार्थी मुंबईत दाखल झाले. त्यांचा निश्चित आकडा अद्याप कळला नसला तरी या विद्यार्थ्यांची संख्या २०० पेक्षा जास्त होती असं काही प्रशिक्षणार्थींनी सांगितलं.

गेले तीन महिने शेकडो कदाचित काही हजार प्रशिक्षणार्थींना आंदोलनाची कल्पना देण्यात आली आणि देशभरातून प्रशिक्षणार्थी मुंबईत दाखल झाले परंतु याची कल्पना कुठल्याही गुप्तचर यंत्रणांना नव्हती किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना नव्हती ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे. हीच बाब धनंजय मुंडे यांनी देखील अधोरेखीत केली.

“रेल्वेभरती परिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत याची गंध वार्ताही सरकारला असू नये हे तर गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. तसेच गेल्या तीन वर्षात सातत्यपूर्णपणे रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे,” असे ट्विट करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यावर बोट ठेवलंय.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, ‘आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे दिसते, मग प्रशासनाला माहिती का नाही? आंदोलकांचे प्रतिनिधी सोबत येवो किंवा न येवो, आम्ही रेल्वेमंत्र्यांना भेटून त्यांच्यासमोर मागण्या मांडणार’.

मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com