बांद्रयामध्ये एका हाऊसिंग सोसायटीच्या वॉचमनने त्याच इमारतीत राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला शनिवारी रात्री घरात एकटी असताना ही घटना घडली. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. राम अचीवार (४०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेची मुलगी घरी आली त्यावेळी तिने आरोपी राम अचीवारला घरातून बाहेर पडताना पाहिले.

तिने त्याला प्रश्न विचारताच रामने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ज्यावेळी तिला रामने तिच्या आईवर बलात्कार केल्याचे समजले तेव्हा तिने इमारतीमधील अन्य रहिवाशांच्या मदतीने त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. अत्यंत क्षुल्लक गोष्टीचे निमित्त करुन आरोपी राम अचीवार पीडित महिलेच्या घरी गेला होता.

तीन महिन्यांपूर्वी तो या हाऊसिंग सोसायटीमध्ये नोकरीला राहिला होता. त्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला होता व संबंधित महिला घरी एकटी असताना अनेकदा तो तिच्या घरी जायचा. पोलिसांनी कलम ३७६ अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Story img Loader