३८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वॉचमनला मुंबई पोलिसांनी मंगळवारी (१६ जुलै) अटक केली आहे. ही ३८ वर्षीय महिला ब्रँड मॅनेजमेंट अँड बिजनेस डेव्हलपमेंट फर्मची वरिष्ठ कर्मचारी असून सोमवारी मढ, मालाडमध्ये तिच्याबरोबर ही घटना घडली. या घटनेतील आरोपी २८ वर्षांचा असून त्याला बिहारमधून अटक करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. डीसीपी झोन-११ आणि मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांच्या पथकाने आरोपीला बिहारमधून अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : केवळ चाईल्ड पॉर्नोग्राफी पाहणं हा गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी मालाड (पश्चिम) मढ परिसरातील व्यासवाडीमधील एका प्रोडक्शन हाऊसमध्ये केअरटेकर आणि वॉचमन म्हणून काम करत होता. प्रोडक्शन हाऊस असलेल्या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यामध्येच ती पीडिता राहते. पीडिता प्रचंड प्राणी प्रेमी असून तिच्याकडे दहा-बारा मांजरे पाळलेली आहेत. तिच्या याच प्राणी प्रेमाचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी आरोपीने पीडित महिलेला म्हटले की, तिने पाळलेली तीन मांजरे त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बंगल्यामध्ये आली आहेत आणि तिने त्यांना घेऊन जावे. जेव्हा पीडित महिला त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तिच्या मांजरांना आणायला गेली; तेव्हा त्या आरोपी वॉचमनने तिला पकडले आणि तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी लावून धरली.

पीडित महिलेने प्रतिकाराचा प्रयत्न केला तेव्हा तो तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्याने तिला बंगल्याच्या आतील खोलीमध्ये जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला. ती प्रतिकाराचा प्रयत्न करत राहिली पण आरोपीने तिच्याकडून जबरदस्तीने शारीरिक सुख मिळवण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. जेव्हा तिने जोरदार प्रतिकार चालवला तेव्हा त्याने तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या सगळ्या झटापटीमध्ये पीडित महिलेच्या मानेवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या आरोपीने महिलेला प्रोडक्शन हाऊसच्या एका खोलीमध्ये बंद केले आणि तो तिथून पळून गेला. पुढे पोलीस म्हणाले की, या महिलेने जवळच राहणाऱ्या आपल्या एका मित्राला फोन करुन मदत मागितली. पीडित महिलेचा मित्र तातडीने आला आणि त्याने तिची सुटका करुन तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर पोलीस तातडीने दवाखान्यात हजर झाले आणि त्यांनी तिचा जबाब नोंदवला. दोन दिवसांच्या उपचारानंतर पीडित महिलेला दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आढाव म्हणाले की, “आरोपीला मंगळवारी बिहारमधून अटक करण्यात आले असून त्याला बुधवारी मुंबईमध्ये आणण्यात आले. त्याला त्याच दिवशी न्यायालयासमोर सादर केले असून त्याला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.”

हेही वाचा : पोलिसांना पोलिसांवरच का करावा लागला लाठीचार्ज? पाहा व्हिडिओ!

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६२ (गुन्हा करण्याचा प्रयत्न), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग), ७५ (लैंगिक छळ), १०९ (हत्येचा प्रयत्न), ११८ (१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे किंवा गंभीर दुखापत करणे), १२७ (२), (जबरदस्तीने डांबून ठेवणे) अशा कलमांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watchman who tried to kill woman after failed rape attempt arrested from bihar vsh
Show comments