मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव, प्रेमनगर येथील प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची ३५ लख रुपयांची पाण्याची देयके थकवली आहेत. तर त्याचवेळी २० लाख रुपयांचे वीज देयकेही थकवले आहे. पाणी देयक थकबाकीप्रकरणी मुंबई महानगर पालिकेने म्हाडाला नोटीस बजावली आहे. दरम्यान पाणी देयके थकीत असल्याने पालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. म्हाडाने लवकरात लवकर थकबाकी भरावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

पहाडी गोरेगाव येथील एक मोठा भूखंड २५ वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर म्हाडाच्या ताब्यात आला. या भूखंडावर अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी घरे बांधण्यात आली आहेत. यातील अल्प आणि अत्यल्प घरांसाठी मंडळाने २०२३ मध्ये सोडत काढली आणि ही घरे तयार असल्याने सोडतीनंतर लागलीच ताबाही देण्यास सुरुवात केली. त्यानुसार प्रेमनगरमधील अत्यल्प गटातील आणि अल्प गटातील घरांचा मोठ्या संख्येने ताबा झाला आहे. मोठ्या संख्येने लोक येथे राहतात, पण आता मात्र मागील दहा-बारा दिवसांपासून येथील रहिवाशांना अपुर्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. तर ही कृत्रिम पाणीटंचाई असल्याचा आरोपही येथील रहिवाशांनी केला आहे. कारण मुंबई मंडळाने या इमारतींची ३५ लाख रुपयांची पाण्याची देयके थकवली आहेत. त्यामुळे पालिकेने काही दिवसांपूर्वीच म्हाडाला याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तर याचअनुषंगाने कृत्रिम पाणी टंचाईने रहिवासी सध्या हैराण असल्याचेही रहिवासी सांगत आहेत.

मुंबई मंडळाने ३५ लाख रुपयांचे पाण्याची देयके थकविले असतानाच दुसरीकडे २० लाख रुपयांचे वीज देयकेही थकवले आहे. इतक्या मोठ्या रक्कमेची देयके थकवल्या पाणी आणि वीज खंडीत होण्याची भिती रहिवाशांना असल्याने मंडळाने लवकरात लवकर ही देयके अदा करावीत अशी मागणी पहाडीतील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. मात्र मंडळातील सुत्रांनी पाणी आणि विजेची बिले देयके थकीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही कारणाने देयके अदा केली गेली नाहीत, पण आता थकबाकी अदा करण्यासंबंधीची कार्यवाही सुरु आहे. येत्या तीन-चार दिवसात पाणी आणि विजेची देयके अदा केली जातील असेही सूत्रांनी सांगितले.