इंद्रायणी नार्वेकर

पाणीवापर वाढल्याने नियोजन कोलमडले; मुंबईत आजपासून कपात

पावसाने फिरवलेली पाठ आणि करोनाकाळात वाढलेल्या पाणीवापरामुळे तलावांतील पातळी घसरली आहे. त्यामुळे मुंबईला जलसंकटाला सामोरे जावे लागत असून, आजपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी या सातही तलावांत मिळून सप्टेंबरअखेरीस साडेचौदा लाख दशलक्ष लीटर पाणी असले की मुंबईला पुढच्या वर्षी जुलैअखेपर्यंत पाणी पुरते. मुंबईला दरदिवशी सुमारे ३,८०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा केला जातो. त्यादृष्टीनेच पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा करोनामुळे पाण्याचा वापर वाढल्याने पालिकेचे जलनियोजन कोलमडले. त्यातच जुलैमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे तलावांतील जलसाठा घसरला आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला. त्याआधीपासूनच करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सतत हात धुणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे आदी सूचना वारंवार दिल्या जात होत्या. मार्च महिन्यापासून मुंबईत संपूर्ण टाळेबंदी आहे. या कालावधीत तरण तलाव, नवीन बांधकामे, हॉटेल, उपाहारगृहे, कंपन्या, कार्यालये बंद असतानाही पाण्याचा साठा मात्र खालावला आहे.

जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यांत तलावक्षेत्रांत चांगला पाऊस झाला तर पाण्याची चिंता मिटते. सप्टेंबरअखेरीस पाण्याचे तलाव पूर्ण भरलेले असतील तरच पाणीपुरवठा सुरळीत राहू शकतो. गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला १४ लाख ३३ हजार दशलक्षलीटर म्हणजेच ९९ टक्के पाणीसाठा होता. आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा जास्त होता. त्यामुळे यंदा पाण्याची चिंता नसेल, अशी आशा होती. मात्र, ऐन ऑगस्ट महिन्यात पाणी कपात करावी लागली आहे.

३४ टक्केच साठा

मंगळवारी ४ ऑगस्टला सातही तलावांत मिळून केवळ ३४ टक्के म्हणजेच पाच लाख दशलक्षलीटर पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्के पाण्याची तूट आहे.

जून महिन्यातला जलसाठा

५ जून २०२०  २,१७,९३४ दशलक्षलीटर

५ जून २०१९  १,३०,५६३ दशलक्षलीटर

५ जून २०१८  २,६४,६७५ दशलक्षलीटर

ऑक्टोबर महिन्यातला जलसाठा

३ ऑक्टोबर २०१९   १४,३३,५३१ दशलक्षलीटर (९९.०४%)

३ ऑक्टोबर २०१८   १३,१०,८४७ दशलक्षलीटर (९०.५७%)

३ ऑक्टोबर २०१७   १४,३०,७८३ दशलक्षलीटर (९८.८५%)

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने तलाव पूर्ण भरले होते. पण, यंदा पावसाने पाठ फिरवलीच. शिवाय हात धुणे, आंघोळ आदींसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणीवापर झाला. त्यामुळे जलसाठा घसरला आहे.

– अजय राठोरे, मुख्य जल अभियंता, पालिका