* आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद  
* ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूरलाही फटका
* ठाण्यात दर बुधवारी पाणी नाही
*‘जलश्रीमंत’नवी मुंबईत मात्र कपात नाही
 अपुऱ्या पावसाचा फटका ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना बसण्यास सुरुवात झाली असून, उल्हास नदीतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने कळवा लघु पाटबंधारे विभागाने तब्बल १४ टक्केपाणी कपात लागू केली आहे. याचा थेट फटका ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर तसेच अंबरनाथ-बदलापूर अशा शहरी भागांना बसणार असून, या सर्व शहरांमध्ये आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे धरण असल्याने या कपातीतून नवी मुंबईकरांची सुटका झाली आहे.
या पाणीकपातीनंतरही ठाणे महापालिकेने स्वत:च्या योजनेतून मिळणाऱ्या सुमारे २१० दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे आठवडय़ातील दर बुधवारी शहरातील काही ठराविक भागातच पाणीपुरवठा बंद राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील बहुतांश महापालिका तसेच नगरपालिकांना उल्हास नदीतून पाणीपुरवठा होत असतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण याच नदीवर उभारण्यात आले असून, या धरणातून एमआयडीसीसह स्टेम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कल्याण- डोंबिवली महापालिका अशी वेगवेगळी प्राधिकरणे पाणी उचलतात. कल्याण-डोंबिवली तसेच उल्हासनगर महापालिकेस औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा होतो, तर स्टेम कंपनीकडून ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिकेस पाणीपुरवठा केला जातो. अंबरनाथ, बदलापूर या दोन शहरांना जीवन प्राधिकरणाकडून पाणी मिळते. ठाणे महापालिकेला स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून तब्बल २१०, तर मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून ६० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. याशिवाय ठाण्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडूनही १०० एमएलडी पाणीपुरवठा होत असतो. दरम्यान, उल्हास नदीतील पाणी पुरविताना तेथील पाण्याची पातळी आवश्यकतेनुसार कायम राहील, याची काळजी लघु पाटबंधारे विभागास घ्यावी लागते. ही पातळी पुढील १५ जुलैपर्यंत कायम राहावी, यासाठी पाणी कपातीची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. पुढील वर्षी पाऊस वेळेवर आला नाही तरी जलसमस्या निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा